सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
कोरेगाव तालुक्यात वर्धनगड येथील जिहे कटापुरच्या बोगद्यातील आऊटलेटवरुन राजकारण तापलेलं पाहायला मिळत असुन रामोशीवाडी, शेलटी, खिरखंडी ,भाटमवाडी या ४ गावांच पाणी बंद करण्याचा प्रयत्न ईरीगेशनच्या अधिका-यांनी केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. विशेष म्हणजे विद्यमान आमदार महेश शिंदे यांच्या सांगण्यावरुन हे काम केलं जात असल्याचा गंभीर आरोप शशिकांत शिंदे यांनी केला आहे.
प्रसारमाध्यामांशी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, रामोशीवाडी, शेलटी, खिरखंडी ,भाटमवाडी ही पाण्याची टंचाई असलेली गावे असून त्याना आऊटलेटच्या माध्यमातून पाणी देण्याचं काम आपण केले होत. परंतु दुर्दैवाने काल पोलीस यंत्रणा आणि जिहे कठापूर योजनेतील अधिकाऱ्यांनी रात्री २ वाजता इथला आऊटलेट बंद करण्यासाठी वेल्डिंगच्या साहित्यासह काम करत होते. महाराष्ट्र्रातील ही पहिलीच घटना आहे कि चोरासारखं रात्रीच येऊन पाणी बंद करण्याचे महापाप चालू आहे.
याप्रकरणी त्यांनी आमदार महेश शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीने कोणताही भेदभाव न करता लोकांसाठी काम करणं गरजेचं असत, पण दुर्दैवाने हे आमदार सुडाचे आणि द्वेषाचे राजकारण करत आहेत असा आरोप शशिकांत शिंदे यांनी महेश शिंदेंवर केला आहे. या गावात त्यांचेही कार्यकर्त्ये असतील पण तरीही कोणत्याही परिस्थितीत या गावांचं पाणी द्यायचं नाही यासाठी पोलीस यंत्रणा आणि जलसंपदा अधिकाऱ्यांवर महेश शिंदे दबाव टाकत आहेत असेही शशिकांत शिंदे यांनी म्हंटल. या बाबतीतला खुलासा प्रशासकीय अधिका-यांना द्यावा लागेल, तसंच जो पर्यन्त पुन्हा या योजनेतुन पाणी सुरु होत नाही तोपर्यन्त जिल्हाधिका-यांच्या दालनात बसुन राहणार असल्याचं सांगत कायदा व सु व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहिल असा इशारा सुद्धा शशिकांत शिंदे यांनी दिलाय.