शताब्दी महोत्सव : कराडचे शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूल स्थापनेला 100 वर्षे पूर्ण

Tilak High School Karad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण क्षेत्रात उच्च गुणवत्ता, संस्कार व देशभक्तीचे धडे देणारी शिक्षण संस्था म्हणून ‘शिक्षण मंडळ कराड’ या शिक्षण संस्थेची ख्याती आहे. आज शिक्षण मंडळ संस्थेस व टिळक हायस्कूलच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने संस्था व टिळक हायस्कूल च्यावतीने शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी यांनी दिली.

कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सचिव चंद्रशेखर देशपांडे, सहसचिव राजेंद्र लाटकर, शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष अॅड सदानंद चिंगळे, उपाध्यक्ष दत्तात्रय भट आदी उपस्थित होते. बाळासाहेब कुलकर्णी म्हणाले, दि 16 ते 22 जानेवारी अखेर विविध कार्याक्रमचे आयोजन करण्यात आले आहे. विविध शैक्षणिक  उपक्रम, नवनवीन योजना व संकल्पना राबवून बहुश्रुत विद्यार्थी घडवण्याचे प्रयत्न अखंडपणे सुरु आहेत. स्पर्धेच्या युगात आपला विद्यार्थी सक्षमपणे सामोरा जाण्यासाठी संस्थेच्यावतीने विविध कोर्सेस सुरु करण्यात आले आहेत. 14 शाखांच्या माध्यमातून 18 विविध कोर्स व संस्थेअंतर्गत 10 हजाराच्या वरती विद्यार्थी ज्ञानार्जन  करीत आहेत. याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.

सहसचिव राजेंद्र लाटकर म्हणाले, या महोत्सव काळात 16 जानेवारी 2023 रोजी महोत्सवाचा शुभारंभ होत आहे. सकाळी 10 वाजता टिळक हायस्कूलच्या मैदानावरती शताब्दी महोत्सवाचा शुभारंभप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री व उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री व राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील, कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण, कराड उत्तरचे आ. बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी या शताब्दी महोत्सवाच्या  सर्व कार्यक्रमांना आजी माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी कराड व परिसरातील नागरिक, शिक्षणप्रेमी व पालकांना मोठ्या संखेने उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.

शताब्दी महोत्सव कार्यक्रमांची रूपरेखा पुढीलप्रमाणे
17 जानेवारी – टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा ‘देश रंगीला’ हा कार्यक्रम, 18 जानेवारी- आत्माराम विद्यामंदिरचा ‘अमृत महोत्सवी भारत’ व इंग्रजी माध्यमाची शाळेचा    ‘इये मराठीचिये नगरी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार.
19 जानेवारी – रोजी महिला महाविद्यालयाचा ‘महाराष्ट्राची कला’ व स्व.रा.कि.लाहोटी कन्या प्रशालेचा ‘रंग महाराष्ट्राचा’ हा सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण.
20 जानेवारी- शिक्षण मंडळ कराड चे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन.
21 जानेवारी – शिक्षण मंडळाच्या गुणवान माजी विद्यार्थ्यांचा ‘मी असा घडलो’ हा मुलाखातीपर कार्यक्रम आणि शिक्षण मंडळाच्या माजी विद्यार्थ्यांचे ‘कुर्यात सदा टिंगलंम’ हे नाटक सादर होणार आहे.
22 जानेवारी – शिक्षण मंडळाच्या सर्व शाखांमधील माजी विद्यार्थी/ विद्यार्थिनी, माजी शिक्षक व  शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा व सायंकाळी माजी विद्यार्थ्यांचा ‘ज्ञानियांचे शिंपले –  स्वरांचे मोती’  अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.

टिळक हायस्कूल व शिक्षण मंडळांची स्थापना कशी झाली
स्वातंत्र्य पूर्व काळात देशात सर्वत्र देशभक्तीला उधाण आले होते. या स्वातंत्र्य संग्रामात अनेक देशभक्त धुरिणांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्य प्राप्तीच्या लढ्यात समर्पीत केले होते. अशा या स्वातंत्र्य संग्रामाच्या अग्रभागी असणारे  लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याचा लढा सुरु होता. अशातच लोकमान्य टिळक यांचे निधन झाले. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर 11 देशभक्त समाजधुरिणांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कराडमध्ये 2 ऑगस्ट 1920 रोजी शोकसभा आयोजित केली होती. या शोकसभेत लोकमान्य टिळकांच्या स्मृति अखंड जोपासण्यासाठी स्मारक म्हणून कराड मध्ये हायस्कूल निर्माण करावे, असे एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. याच राष्ट्रीय विचारातून कराडमध्ये 1921 साली शिक्षण मंडळ या संस्थेची व टिळक हायस्कूलची स्थापना झाली.