हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : औरंगाबाद येथील सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील पिवळ्या भक्ती वाघिणीच्या दुसऱ्या बछड्याचा बुधवारी रात्री साडेदहा वाजता दुर्दैवी मृत्यू झाला. भक्ती वाघिणीची बछडे देण्याची ही पहिलीच वेळ होती. तिच्यामध्ये मातृत्व भावना दिसून आली नसल्याने वाघीण पिल्लांची काळजी घेत नव्हती. स्वतः दूध पाजत नव्हती त्यामुळे पिल्लास ठराविक अंतराने बकरीचे दूध पाजण्यात येत होते.
परंतु 14 एप्रिल रोजी सकाळपासून बछडे अस्वस्थ होते. त्याच्या हालचाली मंदावल्या होत्या. दूध सुद्धा कमी पीत होते. त्याच्यावर प्राणिसंग्रहालयात पशुवैद्यक यांच्यामार्फत उपचार सुरू होते. मात्र दुर्दैवाने बुधवारी रात्री साडेदहा वाजता बछडयाचा मृत्यू झाला. या बछडयाचे शवविच्छेदन 15 रोजी सकाळी डॉक्टर अश्विनी राजेंद्र, पशुधन विकास अधिकारी शासकीय पशू सर्व चिकित्सालय औरंगाबाद यांनी केले.
मृत बछड्याच्या शवाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी एस. बी. तांबे वनपरिक्षेत्र अधिकारी व एस. डी. तांगड वन परिमंडळ अधिकारी औरंगाबाद यांची उपस्थिती होती. या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे अशी माहिती प्राणिसंग्रहालयाचे संचालक यांनी कळविले असल्याची माहिती मनपा जनसंपर्क अधिकारी संजीव सोनार यांनी दिली.