शिवसेनेतून शीतल म्हात्रेंची हकालपट्टी; शिंदे गटात सहभागी झाल्याने कारवाई

Sheetal Mhatre
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेक आमदार आपलेसे केले. त्यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या काही नेत्यांनीही शिंदेंवर निशाणा साधला होता. त्यामध्ये शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचाही समावेश होता. आता त्या शिंदे गटात सहभागी झाल्याने पक्षाने त्याच्यावर कारवाई केली आहे. म्हात्रे याची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडात मुंबईतीलही काही आमदार सहभागी झाले. ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ पाठोपाठ म्हात्रे यांच्या शिंदे गटात सहभागी झाल्याने मुंबईतही शिवसेनेला फटका बसताना दिसत आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वीच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दहीसर, बोरिवली आणि मागाठाणे मतदारसंघात निष्ठा यात्रा काढली होती. या यात्रेनंतर शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

शिंदेंच्या बंडानंतर काय म्हणाल्या होत्या शीतल म्हात्रे?

एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केले. त्यावेळी शीतल म्हात्रे यांनी शिंदे यांच्यावर टीका केली होती. “शिवसेना नेहमी संघर्ष करत असते. बंडखोरांना शिवसैनिकांनी आमदार बनवलं आहे. जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसोबत आम्ही उभे आहोत. आम्ही रस्त्यावर शिवसैनिक उभे राहणार आहोत. शिवसेनेचा भगवा मुंबई महापालिकेवर कायम राहणार आहे. आज गुवाहाटीत बसले आहेत, काय तो दांडा, काय तो डुक्कर, सगळं कसं ओके करणार आहोत आपण, शिवसेनेला शून्यातून उभं करण्याची सवय आहे,” असे म्हात्रेंनी म्हटले होते.