Sunday, March 26, 2023

शिंदे गटाने दिला ‘या’ 3 नावांचा पर्याय; केंद्रस्थानी बाळासाहेबच

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ठाकरे – शिंदे सत्तासंघर्षात निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. नव्या चिन्हासाठी आणि नावासाठी आयोगाने दोन्ही गटांना सोमवारी दुपारपर्यंत मुदत दिली होती. कालच उद्धव ठाकरेंनी आपल्या गटाकडून निवडणूक आयोगाला दिलेले पर्यायी चिन्ह आणि नावे जाहीर केली होती त्यांनतर आता एकनाथ शिंदे गटाकडूनही नव्या पक्षासाठी नावे आणि चिन्हे सादर करण्यात आली आहेत.

शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या नावांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. यामधील शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाचा पर्याय उद्धव ठाकरेंच्या गटानेदेखील दिला आहे. त्यामुळे शिवसेना-बाळासाहेब ठाकरे हे नाव निवडणूक आयोग रद्द करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

चिन्हांच्या बाबतीत देखील ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. उद्धव ठाकरेंनी कालच त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल असे तीन पर्याय निवडणूक आयोगाला दिले आहेत मात्र यातील त्रिशूल आणि उगवता सूर्य या चिन्हावर शिंदे गटानेही दावा सांगितला आहे. त्यामुळे हि दोन्ही चिन्हे निवडणूक आयोग गोठवण्याची शक्यता आहे. तिसरं चिन्ह म्हणून शिंदे गटाकडून गदा हा पर्याय देण्यात आला आहे.