सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र शिवसेनेचे गटनेते मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना घेऊन बंड पुकारले, याला साताऱ्यातील शिंदे समर्थकांनी बॅंनर लावून पाठिंबा दिला आहे. तर शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी मात्र आपण शिवसेनेसोबत असून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता सातारा शिवसेनेत शिंदे- ठाकरे असे दोन गट समोरासमोर आले आहेत.
मंत्री एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथील आहेत. पाटण विधानसभा मतदार संघाचे आ. शंभूराज देसाई व कोरेगाव मतदार संघाचे आ. महेश शिंदे हे दोन्ही आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे. त्यामुळे बंडखोराच्या यादीत सातारा जिल्ह्यातील दोन्ही आमदारांचा समावेश आहे. त्याचबरोबर शिवसेनेकडून 12 बंडखोर आमदारांवर सदस्यत्व रद्दची कारवाईत आ. महेश शिंदे याच्या नावाचाही समावेश आहे. या परिस्थितीमुळे सातारा जिल्ह्यात शिवसैनिक व या तिघांचे समर्थक हे आमनेसामने दिसून येत आहेत. सातारा जिल्ह्यातील शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी बैठका घेवून शिवसेना पक्ष व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. याबाबतच्या बैठकाही होत आहेत. अशावेळी एकनाथ शिंदे यांना समर्थन देणारे बॅंनरही ठिकठिकाणी दिसून येवू लागले आहेत.
“लोकांचा लोकनाथ एकनाथ”
सातारा ते कराड या राष्ट्रीय महामार्गावर लावण्यात आले आहे. यावर बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत अशी हिंदुत्ववादी शिवसेना चालणाऱ्या व धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या एकनाथ शिंदे साहेब व त्यांच्या सर्व काही आमदारांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे छापण्यात आले आहे. तर काही बॅनरवर “लोकांचा लोकनाथ एकनाथ”.. ‘शिंदे साहेब आप आगे बढो, हम आपके साथ है’ असे लिहले आहे.. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी पोवई नाक्यावर शिवसेनेशी बंडखोरी करणाऱ्यांविरोधात शिवसैनिक बसले होते. याउलट आज संपूर्ण साताऱ्यात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरमुळे जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले असुन याची जोरदार चर्चा होत आहे.