हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | खंडाळा तालुक्यातील शिरवळ गाव हद्दीत आलेल्या शिर्के पेपर मिल (ब्राऊन पेपर मिल) ला भीषण आग लागल्याची दुर्घटना आज मंगळवारी दि. १० रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. भीषण आगीमध्ये बंद असलेल्या कंपनीतील लाखो रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले आहे. गेल्या २५ दिवसांत या कंपनीला तिसऱ्यांदा आग लागली आहे. शिरवळ पोलीस, रेस्क्यू टीम आणि एशियन पेंन्ट्स कंपनीचा अग्निशमन बंबाच्या साहाय्याने रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील शिरवळ गाव हद्दीत ब्राऊन पेपर टेक्नॉलॉजी शिर्केमिल नावाची कंपनी आहे. 2012 पासून ही कंपनी बंद अवस्थेत असून कंपनी व कामगारांमध्ये वाद आहे. हा वाद न्यायालयीन प्रक्रियेत असल्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कंपनीला सील करण्यात आली आहे. त्यामुळे या कंपनीकडे फारसे कोणी लक्ष देत नसल्यामुळे ही कंपनी बंद अवस्थेत आहे.
दरम्यान, आज मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास या बंद कंपनीस भीषण आग लागली. कंपनीतून आगीचे तसेच धुराचे लोट बाहेर येत असल्याचे काही लोकांनी पाहिले. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती शिरवळ पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्याना दिली. माहिती मिळाल्यानंतर शिरवळ पोलिस व रेस्कु टीम अग्निशमन यंत्रणेसह घटनास्थळी दाखल झाली आहे. त्यांच्याकडून कंपनीला लागलेली आग विझविण्याचे काम सुरू आहे.
https://fb.watch/nBnwofnexl/?mibextid=6jjUGj
आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडचणी
कंपनीच्या गेटला उच्च न्यायालयाचे सील असल्याने कंपनीत प्रवेश करता येत नव्हता. त्यातच आगीने रौद्ररुप धारण केले होते. अंधार असल्याने आगीवर नियंत्रण मिळविताना अनेक अडचणी येत होत्या. या परिस्थितीत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
महिन्यात तिसऱ्यांदा लागली आग
शिरवळमधील शिर्के पेपर मिलला मंगळवारी रात्री भीषण आग लागली. संपूर्ण कंपनीला आगीने वेढले होते. कामगारांच्या वादात २०१२ पासून ही कंपनी बंद आहे. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, या कंपनीला महिनाभरात तिसऱ्यांदा आग लागली आहे.
जाणुनबुजून आग लावली का?
शिरवळमध्ये मोठमोठ्या औद्योगिक कंपन्या आहेत. त्यामुळे शिरवळ हे औद्योगिक हब झाले आहे. नामांकित कंपन्यांमुळे शिरवळचे महत्त्व वाढले आहे. याठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शिर्के पेपर मील आहे. परंतु, न्यायालयीन वादामुळे गेली १३ वर्षे ही कंपनी बंद आहे. कोणीतरी जाणुनबुजून असे प्रकार करत आहे का? असा संशय व्यक्त होत आहे.