कोल्हापूर प्रतिनिधी | योगेश जगताप
२०१४ सालापासून सातत्याने पाठपुरावा करुनही शिरोळ तालुक्यांतील काही गावात घरकुल योजनेचा लाभ नागरिकांना मिळू शकला नाही. मागील ४ वर्षांत अनेकदा अर्ज देऊनही आणि कागदपत्रांची पूर्तता झाली असतानाही घरकुलाचं घोडं कुठं पेंड खातंय असा सवाल संतप्त ग्रामस्थ विचारत आहेत.
आपली अडचण सांगताना कुटवाड येथील अक्काराम कुंभार म्हणाले, “मागील ४ वर्षांपासून सतत घरकुलासाठी पाठपुरावा करत आहोत. ग्रामपंचायत घरासमोर आहे, सगळ्यांना घराची अडचण माहित आहे. तरीसुद्धा रोजचा दिवस पुढे ढकलणं सुरु आहे. रोज आज-उद्या काम होईल अशी आशा दाखवली जात आहे. या प्रकरणात कुटुंबियांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. छत गळतीमुळे पावसाळ्यात घरात पाणी येत आहे. शिवाय रस्त्यावरून ओघळत येणारं पाणीसुद्धा घरातच साठत आहे. वर्षभरापूर्वी मुलाला मेंदूज्वराचा त्रास झाल्यामुळे दवाखान्यासाठी लाखभर रुपये खर्च करावा लागला. एवढी संकटे असतानाही घरकुल योजनेतून घर मिळेल या आशेवर आम्ही रोजचा दिवस पुढे ढकलत आहोत.”
“जनतेत राहून काम करणारे आमदार म्हणून तालुक्याचे आमदार उल्हासदादा पाटील यांचीही भेट घेतली आहे. त्यांनीही मदतीचं आश्वासन दिलं आहे. वेळ पडली तर खासदार राजू शेट्टींना भेटण्याचीही तयारी आता करावी लागेल. घरकुल योजनेत काम होणार नसेल तर आम्हाला तसं स्पष्ट सांगावं. आम्ही आमच्याजवळील थोडक्या पैशात घराचं काम उरकू, पण उगीच आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये” असंही अक्काराम शेवटी बोलताना म्हणाले.
दरम्यान हासुर, शिरटी, कनवाड या भागातील काही ग्रामस्थांनीसुद्धा अशाच प्रकारची तक्रार हॅलो महाराष्ट्रशी बोलताना सांगितली. या नागरिकांच्या प्रश्नावर गावातील लोकही सहमत आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या संपर्कात राहून या कामांच्या पूर्ततेकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे.