साताऱ्यात अंधेरीची पोटनिवडणूक होईपर्यंत शिवसैनिक मशाल तेवत ठेवणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह देण्यात आलेले आहे. त्यामुळे साताऱ्यातील आंदोलन मॅन समजल्या जाणाऱ्या शिवसेनेचे उपशहर प्रमुख गणेश अहिवळे यांनी हातात मशाल घेऊन संपूर्ण सातारा शहराला 5 किलोमीटरची धावत प्रदक्षिणा घातली. ही मशाल जोपर्यंत अंधेरीच्या पोट निवडणूकीचा निकाल लागत नाही, तोपर्यंत अशीच धगधगत ठेवणार असल्याचे गणेश अहिवळे यांनी सांगितले.

सातारा शहराला रात्री अकरा वाजता गणेश अहिवळे यांनी प्रदक्षिणा घातली. त्यांच्या या अनोख्या पक्ष निष्ठेची चर्चा संपूर्ण सातारा जिल्ह्यात होत आहे. उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर शिवसैनिकांनी सातारा शहराला प्रदक्षिणा घातली. यावेळी मशाल पेटवून पोवई नाका येथून सुरूवात केली. तेथून कमानी हाैद मार्गाने राजवाडा येथून पुढे राधिका रोडवरून बसस्टॅन्डवरून पुन्हा पोवई नाका येथे आले. शहरातील मार्गावर मशाल घेवून जाताना घोषणाही देण्यात आल्या. शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो तर विरोधकांच्यावर हल्लाबोल करताना 50 खोके एकदम अोके अशी घोषणा दिल्या.

सध्या अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक लागली आहे. या पोटनिवडणुकीत पक्षाचे नाव अन् चिन्ह गोठवल्याने राज्यात मोठे राजकारण तापले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उध्दव ठाकरे आणि शिंदे गट याच्यात चिन्ह व पक्षाचे घेण्यासाठी चढोअोढ होती. उध्दव ठाकरे गटाला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे हे नाव निवडणूक आयोगाने दिले आहे. तर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले आहे. या चिन्हानंतर साताऱ्यातील शिवसैनिकांनी मशाल अंधेरी पोटनिवडणूक होईपर्यंत तेवत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.