हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोकणातील भराडी देवीच्या यात्रेला उपस्थित राहत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही परिस्थितीत नाणार प्रकल्प आणणारच असं म्हंटल होत, तसेच यावरून त्यांनी शिवसेनेवर टीकाही केली होती. त्यांनतर आज सामना अग्रलेखातून फडणवीसांचा समाचार घेण्यात आला आहे. फडणवीस कोणत्या धुंदीत आहेत? ते भराडी देवीच्या दर्शनासाठी कोकणात आले होते की कोकणचे स्मशान करणाऱ्या नाणार रिफायनरीची वकिली करण्यासाठी आले होते? अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
फडणवीस यांनी देवीचे दर्शन घेतल्यावर त्यांच्या मेंदूवरील विद्वेषाची जळमटे दूर होतील असे वाटले होते, पण तसे झाले नाही. हे चांगले संकेत नाहीत व भविष्यात देवी त्यांना धडा शिकवणार असा हा कौल आहे. जाहीर सभेत श्री. फडणवीस यांनी नेहमीप्रमाणेच शिवसेना व ‘ठाकरेंवर टीका केली. कोकणात रिफायनरी आणणारच असे त्यांनी गर्जून सांगितले. फडणवीस हे भराडी देवीच्या दर्शनासाठी कोकणात आले होते की कोकणचे स्मशान करणाऱ्या नाणार रिफायनरीची वकिली करण्यासाठी आले होते?
फडणवीस हे कोणत्या गुगीत आहेत? एकतर मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे ते भरकटले आहेत व 2024 सालाआधीच त्यांचे रेडे सरकार कोसळणार याची खात्री पटल्याने ते थयथयाट करीत आहेत. रिफायनरी हवी की नको हे जनता ठरवेल. जनतेच्या फळबागा, शेती, मासेमारी कायमची संपवून कोणी विकासाची भाषा करणार असेल तर तो कोकणी जनतेला संपवण्याचा डाव आहे. कोकणात वायुप्रदूषण व जलप्रदूषण वाढवणारेच प्रकल्प का आणता? असा सवाल शिवसेनेनं केला. नाणार रिफायनरी कोकणात आणण्यापेक्षा गुजरातने महाराष्ट्रातून पळवून नेलेला वेदांत फॉक्सकॉन, एअरबस, ड्रुग्स पार्कसारखे प्रकल्प पुन्हा खेचून घेऊन या व त्यातला एखादा मोठा प्रकल्प नाणारात उभा करा. तसे करणार असाल तर तुम्ही खरे, नाहीतर थापा मारत आहात असेही सामनातून म्हंटल.