Sunday, June 4, 2023

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेने आमदार बोरनारेंवर गुन्हा दाखल

औरंगाबाद – वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या एका महिलेसह तिच्या पतीला घराबाहेर बोलावून शिवसेनेच्या आमदाराने आपल्या साथीदारांच्या मदतीने कार्यक्रमस्थळी राडा घालत महिलेला मारहाण केल्याची घटना शुक्रवार दुपारच्या सुमारास शहरातील गोदावरी कॉलनीत घडली. या प्रकरणी आमदारासह 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

जयश्री दिलीप बोरनारे (रा. सटाना, ता. वैजापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आमदार रमेश नानासाहेब बोरनारे, पत्नी संगीता रमेश बोरनारे, संजय नानासाहेब बोरनारे, दीपक बाबासाहेब बोरनारे, अजिंक्य संपत बोरनारे, रणजित मधुकर चव्हाण, संपत नानासाहेब बोरनारे, अबोली संजय बोरनारे, वर्षा संजय बोरनारे, दिनेश शाहू बोरनारे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तालुक्यातील सटाना येथील जयश्री बोरनारे व दिलीप बोरनारे हे पती-पत्नी शुक्रवारी वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी दुपारी शहरातील गोदावरी कॉलनीत आले होते. त्यावेळी दिलीप यांचे चुलतभाऊ आमदार रमेश बोरनारे त्यांनी पत्नीसह इतर आठ लोकांनी मिळून जयश्री व दिलीप यांना घरातून बाहेर बोलावून तुम्ही भाजपच्या कार्यक्रमात जाऊन आमची बदनामी करत आहे, असे म्हणत मारहाण करण्यास सुरवात केली. घटनास्थळी मोठी गर्दी जमली.

दरम्यान, वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमात अचानक आमदार व त्यांचे भाऊ महिलेला मारहाण करत असल्याचे बघून जमलेले पाहुणे अचंबित झाले. यानंतर पती, पत्नीने थेट वैजापूर पोलिस ठाणे गाठले. मात्र, ठाण्यात वीजपुरवठा नसल्याने ऑनलाइन तक्रार देण्यासाठी या महिलेला चक्क सायंकाळपर्यंत वीज येण्याची वाट बघावी लागली. तसेच पोलिसांनी तक्रार दाखल न केल्यास ठाण्यात आत्महत्या करण्याचा इशारा फिर्यादी महिलेने दिला होता. अखेर रात्री साडेनऊ वाजता वैजापूर पोलिस ठाण्यात गैरकायद्याची गर्दी जमवून शिविगाळ व मारहाण केल्याप्रकरणी 143, 147, 323, 504, 506 या कलमान्वये दहा जणांवर गुन्हा दाखल झाला. घटनेचा तपास उपविभागीय अधिकारी कैलास प्रजापती करत आहे.