कराडात मध्यरात्री सिलेंडरचा स्फोटात 25 घरे जळून खाक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

शहरातील मुख्य भाग असलेल्या टाऊन हॉल, बापूजी सांळुखे पूतळा नजीक असणाऱ्या वेश्या वस्तीला मध्यरात्री दीड वाजता अचानक आग लागल्याची घटना घडली. त्यानंतर आगीत सापडलेल्या चार सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केल्याने सगळीकडे पळापळा सुरू झाली होती. या आगीत 20 ते 25 घरे पूर्णपणे जळून खाक झाली. तब्बल तीन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

घटनास्थळावरील माहिती अशी, कराड शहरात बसस्थानकापासून काही अंतरावर असलेल्या वेश्या वस्तीत अचानक आगी लागली. नंतर चार सिलेंडरचा स्फोट झाला त्यामुळे घरासह परिसरात असणारी छोटी घरे तसेच व्यावसायिकांची खोकी या आगीच्या भक्ष्यस्थानी अडकली होती. या घटनेत सुदैवाने जीवितहानी कोणतीही झालेली नाही, मात्र दोन महिलांना किरकोळ दुखापत झाली आहे. कराड नगरपरिषद अग्निशामक दल तसेच कृष्णा हॉस्पिटलच्या अग्निशामक दलाने पहाटे 4. 30 वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले.

आज मध्यरात्री लागलेल्या आगीमुळे या वस्तीत एकच खळबळ उडाली. अनेक महिला, लहान मुले आक्रोश करीत सुरक्षित स्थळी पळत होती. तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण केल्याने आग आटोक्यात आली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करीत सूचना केल्या. तत्पूर्वी माजी नगरसेवक फारूख पटवेकर, विजय यादव यांनी घटनास्थळावर आग विझवण्यासाठी कार्यकर्त्यांसह मोठी मदत केली. अनेक घरातील साहित्य ही बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.

कोर्ट ड्यूटीवर असणाऱ्या होमगार्डची सतर्कता….

आग लागल्याने वस्तीतील काही रहिवाशी, महिला रस्त्यावर पळत येऊन आक्रोश करताच येथिल कोर्टात रात्रपाळीसाठी ड्यूटीवर असणाऱ्या सूहास देवकर या होमगार्डने धाडसाने वस्तीत धाव घेत तेथिल घरामध्ये घूसून अनेकांना जागं करीत घराबाहेर पडण्यासाठी मदत करुन अग्निशामक दलाला सूचना दिली. तसेच जज निवास्थानात असणाऱ्या न्यायाधिश यांनी ही भितीने रस्त्यावर सैराभर पळणाऱ्या महिला, मूलांना पाण्याची सोय करीत दिलासा देण्याचा प्रयत्न केला.