नारायण राणेंनाही पुरून उरलोय, नादी लागू नका; गुलाबराव पाटलांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले. आता राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येत असून राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीमध्ये जळगावचे नाव नसल्याचा आरोप भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी शिवसेना नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर केला होता. त्यांच्या आरोपाला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. उन्मेष पाटील वेक लक्षात ठेवा मी नारायण राणेंनाही पुरून उरलो आहे. माझ्या नादी लागू नका, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.

शिवसेना नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजप खासदाराकडून आमच्यावर टीका केली जात आहे. आम्ही दोन वर्षात काय केले असे भाजप खासदार उन्मेष पाटील विचारतात परंतु मी त्यांना विचारतो खासदार झाल्यावर खासदार निधीतून एक तरी स्वच्छतागृह बांधले काय? आमदार किशोर पाटील तर तयारच नव्हते पण आपण त्यांना तयार केले आहे.आपण नारायण राणे यांच्या सारख्यांना पुरून उरलो आहोत त्यामुळे उन्मेष पाटील हे तर माझ्या पुढे कुठेच लागत नाही.

राज्य सरकारच्या नुकसान भरपाईच्या मदतीच्या यादीमध्ये जळगाव जिल्ह्याचे नाव नसल्याने भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. टीका करताना त्यांनी म्हंटले होते की, गुलाबभाऊ झोपा काढता काय? त्यांना लाज वाटली पाहिजे. गुलाबराव पाटील हे पालक आहेत का बालक आहेत, असा सवाल पाटील यांनी केला होता. त्यांच्या टीकेला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.