हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. “म्यॉव म्यॉव करणारे आज मात्र, मांजरासारखे लपून बसले आहेत, अशा शब्दात माजी गृहराज्यमंत्री तथा शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी नितेश राणेंवर टीका केली आहे.
दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ” मुंबईत पार पडलेल्या अधिवेशनाच्या काळात भाजप नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत राज्य सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी त्या ठिकाणी विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून म्याव म्याव करत मांजराची नक्कल करत भाजप आमदार नितेश राणे मंत्री आदित्य ठाकरे यांना चिडवत होते. मंत्री आदित्य ठाकरेंना डिवचणारे राणे आज मात्र, लपून बसले आहेत. यामागे एक कारण वाटते की, वाघाला घाबरून की कोर्टाला घाबरून राणे लपून बसलेत माहिती नाही.
जे दुसऱ्यांना चिडवतात त्यांच्यावर देव कधी ना कधी अशी वेळ आणतोच. ते वाघाला घाबरतात की नाही माहीत नाही. ते न्यायालयाला घाबरतात की नाही हे सुद्धा माहीत नाही. पण ते घाबरत आहेत. घाबरले आहेत आणि लपून बसले आहेत ही वस्तुस्थिती आहे, अशी टीका करताना केसरकर यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. कोण दीपक केसरकर विचारणारे नारायण राणे यांनी आपल्या मुलाच्या खासदारकीचा झालेला पराभव आठवावा. म्हणजे दीपक केसरकर कोण हे तुमच्या लक्षात येईल, असा हल्लाबोल केसरकर यांनी केला.