हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेची मागणी शिवसैनिकांकडून केली जात आहे. दरम्यान त्यांच्यावर शिवसनिकांकडून टीकास्त्रही डागले जात आहे. यामध्ये आक्रमक झालेल्या शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी घणाघाती टीका केली आहे. मुख्यमंत्री ठाकरेंना कानाखाली लावण्याबाबतची भाषा करणाऱ्या नारायण राणे ठाण्याच्या रुग्णालयात भरती करुन शॉक दिला पाहिजे, असे मंत्री पाटील यांनी म्हंटले आहे.
शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्री राणेंवर निशाणा साधताना म्हणाले की, “मला वाटतं राणे यांना ठाण्याच्या रुग्णालयात दाखल केले पाहिजे. एक केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री…ज्यांनी ही पदे भोगली आहेत, या पदाची गरिमा त्यांना माहिती आहे. मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा आहे यापेक्षा तो संपूर्ण राज्याचा असतो. राज्याच्या मुख्यमंत्र्याबाबत आपण काय बोलावे याचेही साधे असलं पाहिजे. जर ते नसेल तर त्यांना रुग्णालयात दाखल केलं पाहिजे आणि वेळ आली तर शॉकदेखील दिला पाहिजे,” असे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल त्याविरोधात शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. त्यानुसार नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.