हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचा दसरा मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांबद्दल आपल्या भाषणात उल्लेख केला नाही. त्याबाबत शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मुख्यमंत्री ठाकरेंना घरचा आहेरही दिला आहे. “मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांमध्ये नेहमीप्रमाणे उर्जा जागवली. मात्र या भाषणात शेतकऱ्यांबद्दल मुख्यमंत्री बोलले नाहीत, बोलले असते तर बरं वाटलं असतं,” अशी खंत तिवारी यांनी व्यक्त केली आहे.
शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात शेतकरी यांच्याबद्दल काहीतरी बोलायला हवं होते असे सांगितले. यावेळी तिवारी म्हणाले की, या मेळाव्यात उद्धव ठाकरे एकही शब्द शेतकऱ्यांबद्दल बोलले नाही. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे मी शेतकऱ्यांना सांगितले होते.
निसर्गाच्या आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या मागच्या वर्षाचीही नुकसान भरपाई मिळाली नाही, यंदा तर पंचनामेच नाहीत. ते कधी होणार? असा सवालही तिवारी यांनी यावेळी उपस्थित केला. मंत्र्यांना ग्रामीण जनता निवडणूक देते. मंत्र्यांनी आपल्या कामाबाबत विचार करावा. विदर्भात वर्षभरात हजारच्या वर शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. विदर्भात शेतकरी आत्महत्या वाढण्यास प्रशासन आणि सरकार जबाबदार असल्याचं टीकाही तिवारी यांनी केली आहे.