सातारा । सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत विजयासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी आपली प्रतिष्ठापणाला लावली. अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. पाटण सोसायटी गटात शिवसेनेचे आमदार तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव झाला. पराभवानंतर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस कडून शब्द पाळला जात नाही. सातारा जिल्ह्यात शिवसेनेला एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर महाविकास आघाडी साताऱ्यात आपला आघाडी धर्म पाळत नाही तर शिवसेना येथून पुढील सर्व निवडणूका स्वबळावर लढणार आहे, असा इशारा देसाई यांनी दिला.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत पराभव झाला आहे. याचे कारण एक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवसेनेला जिल्ह्यात एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे जे होत असेल तर लोकशाही पद्धतीने स्वातन्त्रपणे निवडणुका लढण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. उमेदवारी अर्ज भरण्यापुर्वीपासून ते भरल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांकडून कोणताही निरोप आला नाही.
निवडणूक म्हंटल तर जय पराजय होतोच. तो मी स्वीकारला आहे. परंतु 102 मतांच्या निवडणुकीला परिवर्तन अस म्हणता येत नाही. परिवर्तन हे मी मागील 4 महिन्यापुर्वी दाखवल आहे. माझ्या प्रतिस्पर्ध्यानी गेले दोन महिने सणासुदीच्या काळात सुध्दा मतदार बाहेर ठेवले. याला परिवर्तन म्हणतात का ? माझे पक्ष श्रेष्ठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी सांगणार आहे. जर महाविकास आघाडी आपला साताऱ्यात आघाडी धर्म पाळत नाही तर शिवसेना येथून पुढील सर्व निवडणूका स्वबळावर लढणार आहे, असे देसाई यांनी म्हंटले.