सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना बंडखोर विद्यमान आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्ताने ग्रंथतुला करण्यात आली. या कार्यक्रमात आमदारांच्या कार्यकर्त्यांना भानच राहिले नाही, अन् चक्क विरोधी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. या घोषणेमुळे आ. महेश शिंदे यांच्यासह कार्यकर्तेही काही काळ बावचळले. सध्या हा व्हिडिअो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे हे सध्या विधान परिषदेचे आमदार आहेत. मात्र, गेले दोन टर्म ते कोरेगाव मतदार संघातून चांगल्याच मतांनी विजयी झाले होते. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत थोडक्या मतांनी पराभूत झाले. त्यामुळे शिवसेनेच्या तिकिटावर आ. महेश शिंदे यांनी बाजी मारली. त्यानंतर झालेल्या कोरेगाव नगरपंचायत, जिल्हा बॅंक निवडणुकीतही आ. महेश शिंदेची जादू चालली. त्यामुळे राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेच्या आ. महेश शिंदेच्या गटात सामील झाले. मात्र, अद्याप कार्यकर्त्यांना आ. शशिकांत शिंदेच्या विजयाच्या घोषणा देण्याचा मोह सोडवेना अशी परिस्थिती पहायला मिळाली.
वाढदिवस शिवसेना आमदारांचा अन् विजयाच्या घोषणा राष्ट्रवादीच्या आमदारांच्या@shindespeaks @ShivSena @NCPspeaks pic.twitter.com/X9QNrlFRfU
— Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) August 10, 2022
आ. शशिकांत शिंदे व आ. महेश शिंदे यांची सतत काहीना काही कारणास्तव तु…तु…मै…मै होत असते. महाविकास आघाडीची सत्ता असताना देखील दोन्ही आमदारांचे काही जमत नसल्याचे चित्र दिसून येत होते. त्यातच आता शिंदे गटाची स्थापना झाल्यानंतर आ. महेश शिंदे व आ. शशिकांत शिंदे यांचे चांगलेच जुंपल्याचे दिसून येत आहे. मात्र, ग्रंथतुला कार्यक्रमात आ. महेश शिंदे यांचा वाढदिवस अन् विजयाच्या घोषणा आ. शशिकांत शिंदे यांचा दिल्यामुळे सर्वत्र एकच हशा पिकला होता. या ग्रंथुलेचा व कार्यकर्ते देत असलेल्या घोषणेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत असून विरोधकांनी मात्र आ. महेश शिंदे यांना चांगलेच ट्रोल केल्याचे दिसून येत आहे.