शिवसेना आमदारांनो परत चला : साताऱ्यातील शिवसैनिक पोहचला गुवाहटीला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील शिवसैनिक गुवाहटी येथे विमानाने पोहचला असून त्याने आमदारांना परत फिरा अशी साद घातली आहे. सातारा जिल्ह्याचे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय भोसले हे आज शुक्रवारी सकाळी आसामला पोहचले आहेत. शिवसेना जिंदाबाद एकनाथ शिंदे (भाई) मातोश्रीवर परत चला, उध्दवजी- आदित्यला साथ द्या असा फलक घेवून शिवसैनिक पोहचला आहे. गुवाहटीत आमदार ज्या ठिकाणी थांबलेले आहेत, त्या रेडिसन ब्लू हाॅटेलवर त्याबाहेर शिवसैनिक उभा आहे.

संजय भोसले म्हणाले, मी शिवसेनेच्या आमदारांना विनंती करण्यासाठी आलो आहे. एकनाथ शिंदे साहेब आपण हिदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जो आशिर्वाद आणि ताकद दिली आहे ती बाजूला करून आपण दुसरीकडे निघाला आहात ते चुकीचे होत आहे. त्याच्यामुळे आज तुम्हाला सत्ता, पदे मिळाली. बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला एक साद घातली होती, उध्दव आणि आदित्यला साथ द्या. दिवगंत आनंद दिघे यांच्या तालमीत राहून तुम्ही उच्चपदावर पोहचला त्याची प्रतारणा होवू देवू नका.

कुठेही शिवसेने हिदुत्वाचा मुद्दा सोडला नाही, उध्दव ठाकरे यांनी नेहमीच हिदुत्व जपले आहे. मी एक शिवसैनिक म्हणून आलो आहे. जर तुम्ही कट्टर शिवसैनिक असतील ते परत येतील. एकनाथ शिंदे यांचा जो जिल्हा आहे, त्या सातारा जिल्ह्यातील मी एक शिवसैनिक आहे. त्यामुळे मी शिवसेनेसोबत आणि उध्दव ठाकरेंसोबतच असल्याचे संजय भोसले यांनी सांगितले.