हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात भाजप व शिवसेना यांच्यात तुटलेल्या युतीबाबत आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यात महत्वपूर्ण खुलासा केला. यावेळी त्यांनी पंचवीस वर्षाच्या तुटलेल्या युतीबाबत माहिती दिली. महाराष्ट्रात भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षात जी युती होती ती आम्ही तोडली नसून ती भाजपनेच तोडली असल्याचे राऊत म्हणाले. तसेच गोव्यात शिवसेना आता कोणाशीही युती करणार नसून 22 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे राऊतांनी म्हंटले.
गोवा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेकडून मोर्चेबांधणी केली जाऊ लागली आहे. यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत गोव्यात गेले असून त्यांच्याकडून निवडणुकीच्यादृष्टीने तयारी केली जात आहे. या दरम्यान त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले की, “गोव्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आम्ही यापूर्वी देखील गोव्यात निवडणूक लढलो होतो. यावेळेला आम्ही पाहतोय कि गोव्यात नेहमीपेक्षा आता जास्त धुरळा उडालेला आहे. शेवटी गोव्याच्या जनतेच्या मनात जे काही आहे तेच होणार आहे.
महाराष्ट्रात भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षात जी युती होती. ती तुटण्याचाही अनेक कारणे आहेत. मात्र, पंचवीस वर्षांची युती होती. ती आम्ही तोडली नसून ती भाजपनेच तोडली आहे. आणि त्यानंतर आम्हाला वेगळ्या मार्गाने जावे लागले. गोव्यातील जनतेबाबत सांगायचे झाले तर गोव्यातील जनता पाच वर्षांपासून पाहतेय कि या ठिकाणी कोणत्या प्रकारचे राज्य आणि कोणत्या प्रकारचे शासन गोव्यात चालत आहे. गोव्यातील जनतेचा मनात काय आहे तेच या ठिकाणी होणार असल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे.