Wednesday, October 5, 2022

Buy now

जे भडकवत आहेत ते उद्या जगवायला येणार नाहीत; राऊत यांचा सदावर्ते यांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून काल अ‍ॅड. सदावर्ते यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. राऊत यांनी एकदाही त्यांच्या ‘रोखठोक’ मधून कष्टकरी एसटी कर्मचाऱ्यांची बाजू घेतली नाही. हे लज्जास्पद आहे असे ते म्हणाले होते. त्यावरून आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अ‍ॅड. सदावर्ते यांना टोला लगावला. जे आंदोलन भडकवत आहेत. तेच उद्या एसटी कर्मचाऱ्यांना जगवायला येणार नाहीत, असे म्हणत राऊत यांनी अ‍ॅड. सदावर्ते याच्यावर निशाणा साधला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी नुकताच संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्य सरकारच्यावतीने एसटी कर्मचाऱ्यांसाठी चांगली पगारवाढ केलेली आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांनीही राज्य सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत कामावर हजर झाले पाहिजे. मात्र, काही लोक एसटी कर्मचार्याना भडकवण्याचे काम करीत आहे. त्यांनी तसेच करू नये. कर्मचाऱ्यांनीही त्यांच्याकडे लक्ष देऊ नये कारण भडकवणारे लोक उद्या तुम्हाला जगवायला येणार नाही, असे राऊत यांनी म्हंटले.

देशात दररोज संविधान पायदळी तुडवले जाते.हा देश संविधानावर चालावा म्हणून बाबासाहेबांनी संविधान निर्माण केले. संविधानाबाबत मनात प्रेम नसेल तर हा दिवस पाळण्याचे नाटक कशाला करत आहेत? या देशात रोज संविधान पायदळी तुडवण्याचे काम केले जाते. या देशात संविधानाचे राज्य पाहिलेले नाही, अशा शब्दात राऊत यांनी मोदी सरकावर निशाणा साधला.

काय म्हणाले होते अ‍ॅड. सदावर्ते?

एसटी महामंडळाच्या कर्मचारी आंदोलनात पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेणारे अ‍ॅड. गुणरत्ने सदावर्ते यांनी शिवसेनेचे खासदार आणि पत्रकार संजय राऊत यांच्यावर काल टीका केली. संजय राऊत यांनी एकदाही त्यांच्या ‘रोखठोक’ मधून कष्टकरी एसटी कर्मचाऱ्यांची बाजू घेतली नाही. हे लज्जास्पद आहे असे ते म्हणाले. तसेच संजय राऊत हे माझे मित्र आहेत. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत. इथे घडलेले विद्यार्थी कायम तठस्थतेची भूमिका घेतात. मात्र संजय राऊत यांची सध्याची भूमिका लज्जास्पद असल्याची टीका अ‍ॅड. सदावर्ते यांनी केली होती.