Wednesday, February 8, 2023

मोदी सरकार बांगलादेशातील हिंदूंना वाचविण्यासाठी तत्काळ निर्णय घ्या – संजय राऊत

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून भाजपवर नेहमीच निशाणा साधला जातो. आज त्यांनी सामनातील अग्रलेखातून बांगला देशातील धर्मांध मुस्लिमांनी हिंदू धर्मीयांबाबत मत मांडले आहे. ज्या भारताने जगाच्या नकाशात बांगलादेश नावाच्या नवीन राष्ट्राला स्थान मिळवून दिले, त्याच बांगलादेशातील धर्मांध मुस्लिमांनी हिंदू धर्मीयांवर हल्ले केले हे संतापजनक असल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे. तर बांगलादेशातील हिंदूंना वाचविण्यासाठी मोदी सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी राऊत यांनी केली.

संजय राऊत यांनी म्हंटले आहे की, गेले आठ-दहा दिवस हिंदू धर्मीयांवर धर्मांध मुस्लिमांनी जे अमानुष हल्ले चढविले ते अस्वस्थ करणारे आहे. ज्या बांगलादेशची हिंदुस्थानने पाकिस्तानच्या राक्षसी अत्याचारांतून सुटका केली आणि ‘पूर्व पाकिस्तान’ हे नाव कायमचे बदलून ‘बांगलादेश’ नावाचे नवे बाळ जन्माला घातले असल्याची टीकाही राऊत यांनी यावेळी केली.

- Advertisement -

बांगलादेशात नुकताच दुर्गापूजेचा उत्सव सुरु झाला आहे. तेथील धर्मांध मुस्लिमांच्या जमावाने हिंदूंवर ठरवून हल्ले करणे सुरू केले. हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करण्यात आली. हिंदू वस्त्यांमध्ये घुसून शेकडो घरांची तोडफोड केली. सशस्त्र हल्ले चढवून अनेक हिंदूंना भोसकण्यात आले. बांगलादेशातील हिंदूंची कुठलीही चूक नसताना किंवा तेथील हिंदू धर्मीयांनी कुठलीही आगळीक केली नसताना कटकारस्थान रचले गेले असल्याचे राऊत यांनी म्हंटले.