हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज दिवसभरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्र्कांत पाटील व शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एकमेकांवर टीका केली. उध्या शिवसेनेचा दसरा मेळावा होणार असल्याने मेळाव्याच्या पूर्वसंध्येला राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “विरोधी पक्ष अनेक खोटी प्रकरणं उभी करून महाविकास आघाडीला बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाहीत. पण लक्षात ठेवा आम्ही ठकास महाठक आहोत. २०२४मध्ये शिवसेना राष्ट्रीय राजकारणात एक महत्त्वाचा मोहरा आणि केंद्रात सर्वोच्च स्थानी असेल, असे राऊत यांनी म्हंटले आहे.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, राष्ट्रीय नेतृत्व करण्याची क्षमता शरद पवार, उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये आहे. राज्यात सुरू असलेल्या प्रकाराला सूडाचं महाभारत म्हणतात. महाभारतात शेवटी कौरवांचा नाश झाला. कौरव देखील असेच सूडाने वागत होते.
आम्ही आमच्या पक्षाचा विचार मांडतो, आमची भूमिका मांडतो हे भाजपाला मान्य नाही. त्यामुळे केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करायचा आणि आमच्या नेत्यांवर दहशत निर्माण करायची. त्यातून तुम्हाला सत्ता मिळणार असेल तर तुम्ही प्रयत्न करत राहा. पण आमच्या पाठीला कणा आहे हे लक्षात ठेवा. आम्ही मोडू पण वाकणार नाही. उद्याच्या मेळाव्यात पक्षप्रमुख या सगळ्यांचा समाचार घेतील. त्यांना शिवसेना काय आहे हे उद्या कळेल. आम्ही ओढून-ताणून कुणाला निशाण्यावर आणत नसल्याचा इशारा राऊतांनी दिला आहे.