किसनवीर कारखाना वाचविण्यासाठी शिवसेना पॅनेल टाकणार : योगेश बाबर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

किसनवीर सहकारी साखर कारखान्याचा एकूण तोटा 175 कोटीच्या घरात आहे . या कारखान्याने प्रतापगड व खंडाळा हे युनिट चालवायला घेतल्यानेच किसनवीरच्या आर्थिक अडचणी वाढून वाई तालुक्याची सहकार चळवळ धोक्यात आली आहे. पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणारा हा कारखाना वाचविणे ही येथील शेतकऱ्यांची गरज आहे. त्यामुळे आगामी निवडणूकीत आम्ही पॅनेल टाकू अशी घोषणा किसनवीर सहकारी साखर कारखान्यांचे उपाध्यक्ष दिवंगत गजानन बाबर यांचे पुतणे व पिंपरी चिंचवडचे शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत केली .

ते पुढे म्हणाले , गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांची देणी थकविल्याने सहकार खात्याने किसनवीर कारखान्याची 83 अंतगत चौकशी पूर्ण केली आहे. कलम 88 अंतगत कारवाई प्रलंबित आहे. किसनवीर सहकारी साखर कारखान्यांचा आगामी काळात पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. मात्र यंदा कोणताही राजकीय अभिनिवेष न ठेवता कारखान्याची आर्थिक देणी चुकती करून कारखाना वाचवणे ही शेतकऱ्यांची खरी मानसिकता आहे. त्यांच्यावतीने मी ही बाजू मांडत असल्याचे सांगून बाबर पुढे म्हणाले , किसनवीर कारखाना अडचणीत आहे . निवडणूक कार्यक्रम येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता असून मतदार याद्या बनविण्याचा कार्यक्रम सुरू असल्याची माहिती आहे

किसन वीर ची भांडवली किंमत 323.79 कोटी देणी 222 कोटी असून थकबाकी 705 कोटी आहे 2014 साली प्रतापगड व 2016 रोजी खंडाळा सहकारी साखर कारखाना चालवायला घेतल्यानेच यामुळे किसन वीरचा संचित तोटा 174 कोटी पर्यंत वाढून कारखान्याची आर्थिक कोंडी झाली. त्यामुळे कोणत्याही बँकेची मदत होऊ शकत नाही. किसनवीर कारखान्याचा गळीत हंगाम कारखाना बंद असल्याने सुरु झालेला नाही. कार्यक्षेत्रातील उसाला तुरा आला आहे. किसनवीर प्रतापगड व खंडाळा हे तिन्ही कारखाने बंद असल्याने वाई तालुक्याचे सहकार क्षेत्र धोक्यात आला आहे. यंदाची पंचवार्षिक निवडणूक आव्हानात्मक यामध्ये कोणतेही राजकारण होऊ नये ही शेतकऱ्यांची इच्छा आहे. दोन्ही कारखान्यामुळे मूळ कारखाना अडचणीत येऊन आर्थिक दृष्ट्या शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. यंदाची निवडणूक राजकीय अर्थाने न लढता ती कारखाना वाचविण्यासाठी लढली जावी. राजकीय पॅनेलने एकमेकांवर चिखलफेक न करता सहकार टिकावा या दृष्टीने विचार करावा.

किसनवीरसाठी लागणारा निधी एकरकमी आणून पुढील गळीत हंगामाचे योग्य नियोजन व्हायला हवे. 400 कोटीच्या कर्जाचे निवारण कसे करणार याचे स्पष्ट धोरण निवडणूक लढविणाऱ्यांनी करावे. 300 कोटीचे थकित व 67 कोटीचे व्याज याचेही सुस्पष्ट चौकट असावी. को जनरेशन युनिट, डिस्टलरी युनिट बंद पडल्याने कारखान्याचा तोटा वाढला. या युनिटच्या भांडवलांची तरतूद असायला हवी. या मुद्यांवर जाहीर भूमिका काय असणार ? असा सवाल मी शेतकरी व समभागधारक म्हणून विचारत आहोत. प्रसंगी किसनवीर कारखाना वाचविण्यासाठी शिवसेना पॅनेल टाकणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा योगेश बाबर यांनी केली. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सचिन मोहिते किरण खामकर, अविनाश फडतरे उपस्थित होते .

Leave a Comment