हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुक डॉ. इंद्रजित मोहिते व माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या मनोमिलनाचे शिवधनुष्य सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी उचलले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे विश्वजित कदम यांना मदत करत असल्याचे दिसून येत आहे. मनोमिलनासाठी कराडमध्ये खलबते होवू लागले आहेत.
यशवंतराव मोहिते कारखान्यांची निवडणूक ही कराड, वाळवा, पलूस व कडेपूर तालुक्यांसाठी महत्वाची असते. त्यामुळेच कडेपूर मतदार संघाचे आमदार विश्वजित कदम हे कृष्णा कारखाना आपल्या विचारांच्या लोकांच्याकडे रहावा, यासाठी तयारीसाठी रिंगणात उतरले आहेत. वाळवा- इस्लामपूर मधील सभासदांची व नेत्यांचीही भूमिका महत्वाची असते. सध्या निवडणूक जाहीर झाली नसली तरी येत्या काही दिवसांत निवडणूक लागू शकते. त्या अनुशंगाने सभासदांसह नेत्यांना निवडणुकीचे वेध लागले आहेत.
स्व. पतंगराव कदम यांचा नेहमीच इंद्रजित मोहिते यांच्याकडे कल असलेला दिसून आलेला आहे. त्याचप्रमाणे विश्वजित कदम हेही डाॅ. इद्रजित मोहिते यांच्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत सर्व ताकदीनीशी उभे असणार आहेत. तसेच डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्या एकीकरणाची चर्चा सुरू असून आधी नेत्यांचे एकीकरण करण्यासाठीही प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर चर्चेच्या बैठका झाल्या आहेत.
सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून त्याच विचारांच्याकडे कारखाना असावा, त्यादृष्टीने डाॅ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्या मनोमिलनाचा प्रयत्न सुरू झाला आहे. तसेच दोन्ही नेतेही एकमेंकावर टीका करताना दिसत नाही. तसेच सध्या कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न दोन्ही नेत्यांकडून चालू आहे. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही दोघांचे मनोमिलन व्हावे, यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यामध्ये विश्वजित कदम यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सहभाग दिसून येवू लागला आहे. परंतु महाविकास आघाडी सरकारमधील पालकमंत्री बाळासाहेब पाटील, अॅड. उदयसिंह पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भूमिका अजून गुलदस्त्यातच आहेत.
लग्न ठरवायच म्हंटल तर प्रयत्न करावा लागतो,दोद्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न ः विश्वजित कदम
डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या निवासस्थानी ते आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले कृष्णा कारखान्याची निवडणुक आम्ही सर्व शक्तीनिशी लढणार आहोत. मी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. जी मदत डॉ. इंद्रजित मोहिते यांना लागेल ती करणार. निवडणुकीसाठी मी या ठिकाणी स्वतः तळ ठोकून बसणार आहे. काही झाले तरी या निवडणुकीत आम्ही मागे राहणार नाही. त्यासाठी जे जे करावे लागेल ते करणार.कृष्णेची निवडणुक गतवेळी तिरंगी झाली होती. मात्र यावेळी ही दुरंगी करण्याचा प्रयत्न आमचा असून डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांना एकत्रित आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. त्या अनुशंगाने आमच्य बैठकाही पार पडल्या आहेत. लग्न ठरवायच म्हंटल तर प्रयत्न करावा लागतो. त्याच पद्धतीने या दोद्यांना एकत्र आणण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. कॉग्रेसचे सर्व कार्यकर्ते एकत्रिकरणाला अग्रेय आहेत. त्या अनुशंगाने चर्चेच्या फैरी सुरू आहेत. हे दोन नेते एकत्रित आल्यानंतर बाकीचे काय याचाही फैसला करू. कोणत्याही परिस्थितीत ही निवडणुक निखारीची म्हणून लढणार आहे.