हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : लोककला आणि त्यातील ठसकेबाज लावणी ही आज अनेकांना भुरळ घालते. याच लोककलेची सातारा जिल्ह्यातील मूळ गाव औंध असलेल्या शिवम विष्णू इंगळे या तरुणाला मोठी आवड होती. त्याने त्याची आवड जपली आणि बीड येथील गेवराई जवळील बालग्राममध्ये तब्बल 26 तास लावणी सादर करून विश्व विक्रम केला. त्याच्या या लावणीची ऑरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेने दखल घेतली आहे.
मूळचा सातारा जिल्ह्यातील औंध येथील असलेला व सध्या बीड येथे राहत असलेल्या शिवमने शिवमने न थकता, व थांबता सलग 26 तास लावणीचे सादरीकरण करून विक्रमाला गवसणी घातली. त्याच्या या नृत्याचा कार्यक्रम बीडच्या गेवराई येथील बालग्राममध्ये 30 मार्च रोजी सकाळी 11.40 वाजता सुरू झाला होता. तो 31 मार्च रोजी 1.40 वाजता थांबला. शिवमने यापूर्वी तामिळनाडू ट्रेडिशनल करकम फोक डान्स येथे सलग 5 तास लावणी सादर करण्याचा विक्रम ए. शहाजान यांच्या नावे होता.
ऑरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या जागतिक संस्थेने शिवम इंगळे याची नवीन विश्व विक्रम करण्यासाठी व महाराष्ट्राची लोककला देशात पोहचविण्यासाठी निवड केली होती. दरम्यान गेवराई जवळील बालग्राममध्ये हा कार्यक्रम 30 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शिवम याने तब्बल 26 तास लावणी सादर करुन यशाला गवसणी घातली आहे.
https://www.instagram.com/reel/Cp8FN7goqnv/?igshid=YmMyMTA2M2Y=
नामवंत कलाकार व नृत्य दिग्दर्शक
शिवम इंगळे याने यापुर्वीच युवा लावणीसम्राट म्हणून ओळख निर्माण केली आहे. मुळातच तो आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेता आहे. त्याने आपल्या देशाला 2017-18 या सालामध्ये नृत्यात सुवर्णपदक पटकावले होते. यानंतर त्याने अनेक विजेतेपद पटकावलेले असून अनेक पुरस्कारांचा तो मानकरी देखील आहे. तो एक नामवंत कलाकार व नृत्य दिग्दर्शक आहे. सध्या शिवम इंगळे याचे वय 26 वर्ष असून त्याने नॉनस्टॉप 26 तास नृत्याचे सादरीकरण करून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. 26 तासात शिवमने केवळ अधूनमधून ज्युस प्राशन केले.
लावणीबद्दल शिवम म्हणतो….
जर खरा लावणीचा इतिहास बघायला गेलं तर आधीच्या काळात पुरुष हे लावणी त्रिवेशभूषा धारण करूनच लावणी सादर करायचे. ज्यावेळेस स्त्रियांना स्वातंत्र्य भेटले त्यावेळेस स्त्रिया सादर करायला लागल्या. पण खरा इतिहास तर पुरुषांनीच केला होता. मग मी काही वेगळं करत नव्हतो. फक्त हे म्हणणं मांडण्याकरिता मला अनेक लोकांना तोंड द्यावे लागत होते. पण मी ठरवलं होत की काही जरी झालं तरी आपल्याला लावणीला खूप पुढे घेऊन जायचं आहे. ती पारंपारिक तशी आहे याला खूप महत्व मिळाले पाहिजे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. असेच लावणीचे कार्यक्रम, स्पर्धा करता-करता माझी निवड एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आणि त्यामध्ये देखील माझा विजय होऊन मी आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेता झालो. मला प्रत्येक जण लावणी सम्राट या नावाने हाक मारायचे पण मला सम्राट का शब्दापेक्षा लावणी सेवक हा शब्द खूप प्रिय वाटायचा. म्हणून मी लावणी सम्राट शिवम सातारकर गळे यापेक्षा लावणी सेवक शिवम इंगळे या नावाने प्रसिद्ध होत गेलो. मला माझ्या आयुष्यात लावणी शिकण्याकरिता कोणी गुरु मिळाला नव्हता. फक्त सुरेखा बाईना पाहून त्यांची कला मी माझ्यात उत्तरवली होती. म्हणून मी त्यांनाच माझा गुरु मानतो, असे शिवम याने म्हंटले आहे.