उदयनराजेंचं चित्र भिंतीवर काढण्यापेक्षा अजिंक्यताऱ्यावर काढा; शिवेंद्रराजे भोसलेंचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
खासदार उदयनराजे यांच्या चित्राचा वाद हा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणि जम्मू-काश्मीरच्या वादापेक्षाही गहन आहे. त्यांचे चित्र काढायला देत नाहीत याची चर्चा राज्यसभेत होणार असल्याची माहिती मला समजत आहे. त्यांचे चित्र नेमकं कुठं काढायचं याचा निर्णय आता राज्यसभाच देईल. मात्र, चित्र भिंतीवर काढण्यापेक्षा अजिंक्यतारा किल्ल्यावरच काढावे, असा उपरोधिक टोला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी लावला.

साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांचे भिंतीवर चित्र काढण्यावरुन आज सकाळी उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते आणि पोलीसांमध्ये चांगलाच वाद झाला. यामुळे साताऱ्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मराठीमध्ये एक म्हण आहे ‘साठी बुद्धी नाठी’ या म्हणीप्रमाणे आता नुकताच उदयनराजे यांचा वाढदिवस झाला आहे. त्यांची वाटचाल साठीकडे सुरू आहे आणि ही म्हण त्यांना लागू होऊ नये म्हणून त्यांनी वेळीच कार्यकर्त्यांना आवर घातला पाहिजे.

दरम्यान, आज सकाळी उदयनराजे भोसले यांच्या पेंटींगवरून शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही कारवाईची प्रतिक्रिया दिली आहे. साताऱ्यात कायद्यांचे पालन कोणी न केल्यास थेट पोलिसांच्या कारवाईला समोरे जावे लागेल, असा इशारा मंत्री देसाई यांनी दिला आहे.