आ. शिवेंद्रराजेंचा कास महोत्सवाला विरोध म्हणाले, तीन दिवासासाठी झाडांची कत्तल…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
कास महोत्सव शासनाच्या माध्यमातून होतोय का काही खासगी डान्स क्लासेस चालवणाऱ्या लोकांच्या आग्रहाखातर होतोय, त्या व्यक्तींना चार पैसे मिळावेत म्हणून कोणत्यातरी लोकप्रतिनिधीच्या मागणीवरून होतोय का? बगलबच्चांची घरे चालवण्यासाठी हा आटापिटा सुरु आहे? नेत्यांच्या जवळ असणाऱ्या डान्स क्लासेसवाल्यांनी पैसे मिळावेत, यासाठी डान्स शो, लेजर शो ठेवला असून हे चुकीचे आहे. तेव्हा शासनाने स्वतः हा महोत्सव करावा, कुणाच्यातरी आग्रहाखातर खासगी लोकांच्या माध्यमातून होवू नये अशा शब्दात नाराजी व्यक्त करत आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी या महोत्सवाला विरोध दर्शवला.

आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, ‘कास महोत्सव’ या नावाखाली महोत्सव घ्यायचे काम सुरु आहे. ‘कास हे इको सेन्सिटिव्ह’ या पर्यावरण गोष्टीने गाजत आहे. पर्यावरणाची हानी होऊ नये, असे असताना कास महोत्सवाच्या नावाखाली वृक्षतोड करण्यात आली आहे. यावर वनविभागाने लक्ष देवून कारवाई करणे गरजेचे आहे. महोत्सव करायचा असला तर प्रशासनाने स्वतः करावा. खासगी लोकांना कॉन्ट्रॅक्ट देऊन करू नये. यासाठी पर्यटन विभागाने आदेश काढले आहेत का? शासनाने परिपत्रक काढले आहे का? डीपीडीसीतून काही नियोजन केले आहे का? या गोष्टी लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडे आलेल्या नाहीत. मग हा महोत्सव होतोय कशातून, त्याला देण्यात येणारा निधी कोणाच्या आग्रहामुळे होत आहे.

कासला पर्यटक यायला पाहिजेत, पर्यटक आल्याने साताऱ्याच्या बाजारपेठेला, हॉटेल व्यावसायिकांना फायदा होत आहे. रस्ते सुंदर केले आहेत. पठारावरील खराब रस्त्याचे काम लवकरच सुरु होईल. कासचे पर्यावरण जपणे गरजेचे आहे. आता आयोजित केलेल्या महोत्सवाच्या नावाखाली वृक्षतोड होत असेल तर ती दुर्दैवी गोष्ट आहे. महोत्सव जिल्हा प्रशासन किंवा पर्यटन विभागाने स्वतः घ्यावेत. खासगी लोकांना पैसे मिळावे म्हणून किंवा कोणी तरी पत्र देतेय म्हणून होवू नयेत. आपल्या बगलबच्यांची घरे चालवण्यासाठी हा महोत्सव होतोय का? याबाबत योग्य ठिकाणी तक्रार करणार असल्याचे आ. शिवेंद्रराजेंनी सांगितले.

कास पर्यटक पठारावर जी हॉटेल बांधली आहेत, ती त्या व्यावसायिकांनी स्वतःच्या जागेत बांधली आहेत. मात्र काही जणांनी सर्व मंजुऱ्या घेणे गरजेचे होते तसे झाले नाही. याबाबत पुढील प्रक्रिया सुरु आहे. एकीकडे व्यावसायिकांना नोटिसा द्यायच्या आणि दुसरीकडे तीन दिवसांसाठी झाडे तोडायची अन् 70 ते 75 लाख रुपये खर्च करायचा. कोणत्यातरी खासगी माणसांसाठी हा उद्योग सुरु आहे. हा शासनाचा पैसा असून करदात्याच्या पैशाची लूट थांबली पाहिजे, असेही आ. शिवेंद्रराजेंनी सांगितले.