हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आसाम-मिझोराममध्ये सीमावादावरून संघर्ष उफाळून आला. या संघर्षांच्या हिंसक ठिणग्याही उडाल्या. या हिसेंचे पडसाद संसदेतही उमटले. तर दुसरीकडे देशाच्या सीमेलगत असणाऱ्या या दोन्ही राज्यातील वादावर चिंता व्यक्त होऊ लागली. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी वेळीच पावले उचलून आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांतील झगडा मिटवायलाच हवा. अन्यथा देशाच्या सीमेवर नवा संघर्ष अटळ आहे! असा सल्ला शिवसेनेने अमित शहा यांना दिला.
हिंदुस्थानातील काही राज्यांत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तणावाचे विषय केंद्राशी संबंधित असल्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांना विशेष लक्ष द्यावे लागेल. आसाम व मिझोराम ही ईशान्येकडील दोन राज्ये हिंदुस्थानच्याच नकाशावर आहेत, पण दोन राज्यांतील सीमावादाने उग्र स्वरूप धारण केले. हिंदुस्थान-पाकिस्तान किंवा चीनच्या सीमेवर दोन सैन्यांत गोळीबार, संघर्ष होतो, तसा रक्तरंजित लढा दोन राज्यांतील पोलिसांत झाला. त्यात काहीजणांचे बळी गेले. राष्ट्रीय एकता, एकात्मता, अखंड हिंदुस्थान या संकल्पनांना तडा देणारे हे प्रकरण आहे. असे शिवसेनेने म्हंटल आहे.
आसाम आणि मिझोराममधील जमिनीचा वाद आज वरवर शांत दिसत असला तरी खदराद्ध कायम आहे. ही दोन्ही राज्ये संवेदनशील व देशाच्या सीमेवर आहेत. ईशान्येकडील राज्ये अशांत राहणे म्हणजे बाहय शत्रूंना वाव देण्यासारखे आहे. आसाम आणि मिझोराम ही दोन राज्ये 165 किलोमीटर सीमांचे एकत्रित धनी आहेत. हा वाद ब्रिटीश काळापासून आहे.
एका बाजूला आपण म्हणायचे की, कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हिंदुस्थान एक आहे, अनेकतामध्ये एकता आहे, पण प्रत्यक्षात चित्र काय दिसते? हिंदुस्थानी संस्कृतीवर चर्चा आपण करतो तेव्हा काय सांगतो? येथे केवळ दुःखं वाटून घेतली जातात. त्याच वेळी आपण जात, धर्म आणि राज्यांच्या सीमांवरून खुनी खेळ करीत आहोत. जम्मू-कश्मीरात अशांतता आहेच. त्यात आसाम-मिझोरामच्या जमिनीच्या भांडणात रक्तपात झाला आहे. दोन राज्यांच्या पोलिसांनी एकमेकांवर बंदुका चालवल्या. यास देशांतर्गत युद्धच म्हणावे लागेल. याचा फायदा बाजूचे शत्रू राष्ट्र उठवल्याशिवाय कसे राहतील? असा सवाल शिवसेनेने केला.
आसामविरुद्ध मिझोराम असेल, नाहीतर महाराष्ट्र कर्नाटकाचा सीमावाद असेल. पाणीवाटपापासून जमिनीचा, जंगलाच्या भांडणाचा मुद्दा असेल, केंद्र सरकार राजकीय सोय पाहून स्वतःची कातडी वाचवत असते. कश्मीरप्रश्नी पाकिस्तानला दमदाटया करून राजकीय माहोल निर्माण करता येतो. तसा राज्यांतर्गत प्रश्नी करता येत नाही हेच त्यामागचे कारण. प्रसंगी कटुता घेऊन न्याय करणारे रामशास्त्री बाण्याचे सरकार अजून देशात जन्माला यायचे आहे. तोपर्यंत राज्याराज्यांचे मिझोरामी झगडे सुरूच राहतील. असे शिवसेनेने म्हंटल. आसाम मिझोराम वादामुळे देशाच्या अखंडतेला तडे जातील. हे देशाला घातक आहे. गृहमंत्री शहा यांनी वेळीच पावले उचलून आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांतील झगडा मिटवायलाच हवा. अन्यथा देशाच्या सीमेवर नवा संघर्ष अटळ आहे! असा सल्ला शिवसेनेने अमित शहा यांना दिला.