हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत 25 आमदारांसह गुजरात गाठले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले असून राजकीय भुकंप होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान शिवसेनेनं मोठी कारवाई करत एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवले आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेला प्रस्ताव शिवसेनेने फेटाळला आहे. येवडच नव्हे तर विधीमंडळ नेतेपदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्या जागी अजय चौधरी यांच्याकडे विधीमंडळ नेते पदाची धुरा देण्यात आली आहे. अजय चौधरी हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात.
नॉट रीचेबल एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत प्रथमच भाष्य केले, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत