हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राजधानी नवी दिल्लीत भेट घेतली. शेतकरी आंदोलन, सीमा सुरक्षा यावर आपण चर्चा केलयाचं अमरिंदर यांनी सांगितलं. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून कॅप्टन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अमरिंदर सिंग यांनी सगळी पदे काँग्रेस मधेच भोगली. आता भोगायला उरले नाही, तरी खुर्चीचा मोह सुटेना अस म्हणत शिवसेनेने त्यांच्यावर निशाणा साधला.
आता मी काँग्रेसमध्ये थांबणार नाही व भाजपातही जाणार नाही असे पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केले आहे. कॅ. अमरिंदर हे भाजपात जाणार नाहीत, पण बाहेर राहून काँग्रेसचा घात करणार, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर त्यांनी ठरवलेले दिसते. पंजाबातील घडामोडींनी काँग्रेसचे भवितव्य टांगणीला लागले आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर अमरिंदर दिल्लीस आले. ”भाजप नेत्यांना तुम्ही भेटणार काय?” या प्रश्नावर अमरिंदर म्हणाले, ”मी भाजप नेत्यांना भेटणार नाही. दिल्लीत माझ्या सामानाची आवराआवर करायला आलो आहे.” पण लगेच दुसऱ्या दिवशी ते अमित शहांना भेटले.
शेतकरी आंदोलन, सीमा सुरक्षा यावर आपण चर्चा केली, असे धादांत खोटे ते बोलतात. हे विषय खरोखरच महत्त्वाचे असतील तर गृहमंत्र्यांनी पंजाबच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांशीच चर्चा केली पाहिजे. राज्याच्या प्रश्नांवर बडतर्फ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची ही रीत कुठली? केंद्र सरकार हे नवे पायंडे पाडत आहे ते बरे नाही.
कॅ. अमरिंदर येतील व जातील. त्यांनी सत्तेची सर्व सुखे काँग्रेस पक्षातच भोगली आहेत. आता भोगायला उरले नाही तरीही खुर्चीचा मोह सुटत नाही. भाजप अशा अमरिंदर सिंगांना मांडीवर बसवून काय मिळवणार? केंद्रीय गृहमंत्र्यांनी पंजाबच्या लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांना डावलून काँग्रेसने दूर केलेल्या व आमदारांचा पाठिंबा गमावलेल्या अमरिंदर सिंग यांच्याशी सीमा सुरक्षेबाबत चर्चा करणे बरोबर नाही,’ असेही शिवसेनेने म्हंटल.
सिद्धूवर साधला निशाणा-
दरम्यान, नवजोतसिंग सिद्धू यांच्याबाबत देखील अग्रलेखातून राहुल गांधींना सल्ला देण्यात आला आहे. “वर्षानुवर्षे पदं भोगून सत्तेचा मलिदा खाऊन ढेकर देणाऱ्या म्हातार मंडळाने जी-२३ नावाचा गट स्थापन केला. राहुल गांधींनी जसे या म्हातार मंडळाच्या झांशात येऊ नये, तसे नवजोत सिंग सिद्धूसारख्या येडबंबूच्या नादालाही लागू नये. काँग्रेस पक्षात जुने भरवशाचे लोक म्हातारचळ लागल्याप्रमाणे वागत आहेत, तर सिद्धूसारख्या लोकांचे चित्त ठिकाणावर नाही. पंजाबातील काँग्रेसचा उरलासुरला पायाही हे येडबंबू खतम करतील”, असा सल्ला शिवसेनेनं अग्रलेखातून दिला आहे.