हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकारच्या वाईन विक्री वरून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त करत याविरोधात उपोषणाचा इशारा दिला होता. तसेच तुमच्या राज्यात जगण्याची माझी इच्छा नाही असेही ते बोलले होते. यानंतर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून अण्णा हजारे यांच्या वर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्रात जगण्याची ईच्छा नसणारे कर्मदारिद्री आहेत अस म्हणत शिवसेनेनं अण्णांवर टीका केली आहे.
काँग्रेसचे राज्य दिल्लीत व महाराष्ट्रात असताना अण्णा ऊठसूट उपोषणे व आंदोलने करीत. पण आता अण्णा हजारे (Anna Hazare) भाजपचीच भाषा बोलतात, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली. अण्णांचे वैफल्य हे आहे की, अण्णांच्या प्रत्येक आंदोलनातली हवा निघून गेली आहे व मोदी-शहांचे सरकार केंद्रात आल्यापासून त्यांना कोणी फारसे विचारत नाही. रामलीला मैदान, जंतर मंतरवर त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध रणशिंग फुंकले, त्या रणशिंगात हवा फुंकणारे आज दिल्लीतील सत्ताधीश आहेत, पण ज्या ‘लोकपाल’साठी अण्णांनी लढाई केली तो लोकपाल आज गुजरात राज्यातही नेमला गेला नाही, दिल्ली तो बहोत दूर है! ”मी इतका मर मर मेलो, उपोषणे केली, पण कर्मदरिद्री भाजपवाले एक लोकपाल नेमायला तयार नाहीत. आता जगायचे कशाला?” असा त्रागा खरे तर अण्णांनी करायला हवा होता, असा टोला शिवसेनेने लगावला.
ज्यांना महाराष्ट्रात जगायची इच्छा नाही ते कर्मदरिद्रीच म्हणायला हवेत. वाईन विक्रीसंदर्भातील निर्णयानंतर अण्णा हजारे महाराष्ट्रावर कसल्या गुळण्या टाकत आहेत आणि कोणाच्या प्रेरणेने टाकत आहेत, हे त्यांनाच माहिती आहे. अण्णा म्हणतात मला जगायचे नाही. वयाची ८४ वर्षे झाली, खूप झाली. मी जगून घेतले. म्हणजे ते खूप जगून घेतल्याचा आनंद व्यक्त करत आहेत. राळेगणच्या यादवबाबाने तुम्हाला जेवढे आयुष्य दिले तेवढे तर जगावेच लागेल. पण त्यासाठी महाराष्ट्राची बदनामी का करता असा सवाल शिवसेनेनं केला.
पुलवामात आपले ४० जवान सरकारच्या बेपर्वाईमुळे शहीद झाले. तेव्हाही अण्णांना आता जगायचे कशाला असा प्रश्न पडला नाही. करोना काळात गंगेत हजारो प्रेते वाहून जाताना जगाने पाहिली. मनुष्य हळहळला, पण गंगेतील प्रेतं पाहूनही अण्णा हजारे यांना नैराश्य आले नाही व आता जगायचे कशाला हा पांचट प्रश्न पडला नाही. दोनेक दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला. पण अण्णांनी हा अपमान गिळला व वाईन वाईनचा गजर करत आता जगणे नाही, असा सूर लावला अस म्हणत शिवसेनेनं अण्णा हजारे यांचा समाचार घेतला.