हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेलं वादग्रस्त वक्तव्य अन् त्यामुळे विधानसभेत झालेल्या गोंधळामुळे राज्यपालांनी मधेच सोडलेलं अभिभाषण या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातुन भाष्य करत भाजप आणि राज्यपालांवर सडकून टीका केली आहे.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्यपालांना आपले अभिभाषण अर्धवट सोडून जावे लागले. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी गोंधळास सुरुवात केली व राज्यपाल ठरल्याप्रमाणे भाषण सोडून निघून गेले. त्यांनी ‘जय हिंद’ ही म्हटले नाही व ‘जय महाराष्ट्र’ही म्हटले नाही. राष्ट्रगीत होईपर्यंतही राज्याचे घटनात्मक प्रमुख थांबले नाहीत. अनेक राज्यांच्या विधानसभा अधिवेशनात याआधी राज्यपालांचे भाषण सुरू असताना अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला आहे. म्हणून कोणतेही राज्यपाल अभिभाषण सोडून गेल्याचे उदाहरण नाही, पण महाराष्ट्राच्या राज्यपालांनी नवीन पायंडा पाडला आहे.
विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जे नाटय़ घडविण्यात आले त्याची संहिता भाजप कार्यालयात लिहिली गेली व त्या नाटय़ाचे महानायक हे राज्यपाल होते हे आता स्पष्टच झाले. अलीकडे लोक खाल्ल्या मिठास जागताना तर दिसत नाहीत, पण राज्यपाल महोदय जुन्या पक्षाच्या मिठास जागून महाविकास आघाडीच्या दुधात मिठाचा खडा टाकत आहेत. अर्थात त्यामुळे दूध नासणार नाही. त्या दुधाचे दही किंवा लोणी होईल. विरोधी पक्षाने त्यांची घुसळण कायम ठेवली पाहिजे.
राज्यपाल हे महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्याप्रमाणे ते वागत आहेत. राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व त्यांचा पक्ष जे बार उडवीत आहेत ते सर्व फुसकेच ठरत आहेत. राज्य बहुमतावर चालते व सरकारकडे 170 चे बहुमत कायम आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला जनादेश नाही व ते घालवायला हवे, असे कारस्थान कोणाच्या भरवशावर चालले आहे? असा सवाल शिवसेनेनं केला.
महाराष्ट्राच्या राज्यपालांनी अलीकडच्या काळात दोन घाणेरडी विधाने केली. सावित्रीबाई फुले यांच्याबाबतीत त्यांनी केलेले विधान समस्त स्त्रीवर्गाची मान खाली जावी असेच आहे. राज्यपालांनी हसत खेळत सावित्रीबाईंचा अपमान केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करीत राज्यपालांनी त्यांच्या गुरूचा शोध लावून समस्त महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या. याची लाज भाजपास वाटू नये याचेच आश्चर्य वाटते. महाराष्ट्राची, शिवाजी महाराजांची माफी मागा अशा घोषणा काही सदस्यांनी दिल्या असतील, तरीही राज्यपालांनी भाषण 90 सेकंदांत गुंडाळणे योग्य नव्हते असेही शिवसेनेनं म्हंटल.