हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटरबॉंब टाकून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले असून राज्य सरकार अडचणीत आले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे ठाकरे सरकार बॅकफूटवर गेले असले तरी शिवसेनेने सामना अग्रलेखातुन भाजपवर हल्लाबोल केला आहे. पोलीस आयुक्तांना हटवा” अशी मागणी करणारे भाजपवाले आता त्याच परमबीर सिंग यांना खांद्यावर घेऊन लग्नाच्या वरातीत नाचावे तसे बेभान होऊन नाचत आहेत असा टोला शिवसेनेने लगावला.
परमबीर हे विरोधकांची ‘डार्लिंग’ झाले आहेत व परमबीर सिंग यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारवर निशाणा साधीत आहेत, असे शिवसेनेनं म्हटलंय. महाविकास आघाडी सरकारजवळ आजही चांगले बहुमत आहे. बहुमतावर कुरघोडी कराल तर आग लागेल. हा इशारा नसून वस्तुस्थिती आहे. एखाद्या अधिकाऱ्यामुळे सरकारे येत नाहीत व कोसळत नाहीत, हे विरोधकांनी विसरू नये!, असेही संपादकांनी सांगितलंय.
परमबीर सिंग यांची राज्य सरकारने पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी केली आहे. अॅण्टिलिया स्फोटके प्रकरणात फौजदार सचिन वाझे एनआयएच्या अटकेत आहेत. हे सर्व प्रकरण व्यवस्थित हाताळले नाही व पोलीस खात्याचीच बदनामी झाली असे मानून सरकारने पोलीस आयुक्तांना हटवले. ”सचिन वाझे यांना हटवून काय फायदा? पोलीस आयुक्तांना हटवा” अशीच भाजपची मागणी होती. आता त्याच परमबीर सिंग यांना खांद्यावर घेऊन भाजपवाले लग्नाच्या वरातीत नाचावे तसे बेभान होऊन नाचत आहेत. हा राजकीय विरोधाभास आहे.
परमबीर सिंग यांचे म्हणणे असे की, गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला शंभर कोटी रुपये गोळा करून द्यायला सांगितले. मुंबईतील 1750 बार-पबमधून हे पैसे उभे करावेत असे गृहमंत्र्यांचे म्हणणे होते, पण गेल्या दीडेक वर्षात मुंबई-ठाण्यातील पब्स-बार कोरोनामुळे बंदच आहेत. त्यामुळे हे इतके पैसे कुठून गोळा होणार, हा प्रश्नच आहे. परमबीर सिंग यांनी थोडा संयम ठेवायलाच हवा होता. पुन्हा सरकारला अडचणीत आणण्यासाठी परमबीर सिंग यांचा कोणी वापर करीत आहे काय? ही शंका आहेच, असेही अग्रलेखात म्हटले आहे.
सरकारला फक्त बदनामच करायचे असे नाही, तर सरकारला अडचणीत आणायचे असे त्यांचे धोरण आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन मोदी-शहांना भेटतात व दोन दिवसांत परमबीर सिंग हे असे पत्र लिहून खळबळ माजवतात. त्या पत्राचा आधार घेऊन विरोधी पक्ष जो हंगामा करीत आहे हा एक कटाचाच भाग दिसतो.
एका बाजूला राज्यपाल राजभवनात बसून वेगळेच उपद्व्याप करीत आहेत तर दुसऱ्या बाजूला केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबावाचा खेळ करीत आहे. कुठे एखाद्या भागात चार कोंबडय़ा व दोन कावळे विजेच्या तारांचा शॉक लागून मेले तरी केंद्र सरकार महाराष्ट्रात सीबीआय किंवा एनआयएला पाठवू शकेल असे एकंदरीत दिसते. असा टोलाही सामनातून लगावण्यात आला आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा