सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक निकालानंतर पाटण मतदारसंघात पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोपाना सुरुवात झाली आहे. दरम्यान, आगामी 2024 विधानसभा निवडणुकीत तुम्हाला सुपरहिट शोले पिक्चर दाखवतो असे म्हणत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांना खुलं आव्हान दिले आहे. ते नाटोशी ते कुसरुंड रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते.
शंभूराज देसाई म्हणाले, विधानसभा निवडणुकीत सत्यजित पाटणकरांना जनतेने एकदा १८ आणि पुन्हा १५ हजार मतांनी पराभव करून अस्मान दाखवल आहे. मात्र, जिल्हा बँक निवडणूक निकालाने ते हुरळून जाऊन चित्रपटातील ट्रेलर ची भाषा करत आहेत. मात्र, मीच त्यांना २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ‘शोले’ चित्रपटाचा ट्रेलर दाखवणार असून तो सुपरहिट ठरेल, असा टोला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सत्यजित पाटणकरांना लगावला.
ना. शंभूराज देसाई म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे आणि त्यामुळे आघाडी धर्म पाळा असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा असल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गाफील राहिलो. त्यामुळे माझा मोजक्या मतांनी पराभव झाला. परंतु ते एक प्रकारे बरेच झाले. त्यानिमित्ताने मला पुढचा धोका तरी लक्षात आला. आता तीन वर्षे माझ्या हातात आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महत्त्वाची पाच खाती माझ्याकडे दिली आहेत. त्याच्या माध्यमातून तालुक्याचा कायापालट करणार असून यापूर्वी देखील गट-तट बाजूला ठेवून संपूर्ण तालुक्यात विकासाचा रोडमॅप तयार करुन कामे केली आहेत असे शंभूराज देसाई यांनी म्हंटल.