मुंबई । सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठी किंमत मोजावी लागेल असा जाहीर इशारा दिला आहे. महाराष्ट्रात ठाकरे सरकार आल्याने काही लोकांच्या पोटात दुखत असून अस्वस्थ आहेत. वैफल्यातून अशा प्रकारचे घाणेरडे आरोप केले जात आहेत अशी टीकाही त्यांनी केली आहे. एएनआयशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत म्हणाले कि, ‘आदित्य ठाकरे यांच्याविरोधात दळभद्री राजकारण सुरू आहे. या सगळ्या घटनेशी आदित्य यांचा काय संबंध आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच, विरोधी पक्षाकडून महाराष्ट्रात ठाकरे सरकारमुळं विरोधी पक्षातील नेते अस्वस्थ आहेत. हे सरकार अस्थिर करू शकले नाहीत या वैफल्यातूनच आदित्य ठाकरेंवर हे आरोप केले जाताहेत,’ असं ते म्हणाले आहेत.
‘आदित्य ठाकरेंना पूर्ण महाराष्ट्र ओळखतो. ठाकरे कुटुंबातील ते एक महत्त्वाचा घटक आहेत. ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असे कोणतेही कृत्य त्यांच्याकडून होणार नाही, असं त्यांनीही स्पष्ट केलं आहे. त्यावर आमचा विश्वास आहे. ज्यांना कारस्थान करायचंय ते करूद्यात. हे कारस्थान फक्त एका युवा मंत्र्याविरुद्ध नाही किंवा ठाकरे कुटुंबाविरोधात नाही ते महाराष्ट्राविरोधात केलं जातंय. या कारस्थानामागचा खरा सुत्रधार कोण, हे आम्हाला माहिती आहे. कारस्थान करणाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल.’ असा सूचक इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरेंनी त्यांच्यावर होण्याऱ्या आरोपांवर निवेदन प्रसिद्धीला देत सडेतोड उत्तर दिलं आहे. सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. मुळात या संपूर्ण प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही, असं त्यांनी आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच, सुशांत प्रकरणी कुणाकडे काही विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांकडे द्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील, असे आवाहनही आदित्य यांनी केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”