हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकेकाळी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि एकनिष्ठ म्हणून हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांची ओळख. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होत बांगर यांनीही सेनेशी बंडखोरी केली. त्यानंतर आता सेनेनेही अनेक बंडखोरांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. सेनेने संतोष बांगर यांना मोठा दणका दिला असून त्यांची शिवसेना जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
संतोष बांगर यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने त्याच्यावर कारवाईची मागणी जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्याकडे पक्षातील जिल्ह्यातील शिवसैनिकांनी केली होती. त्यानंतर रविवारी आमदार संतोष बांगर यांना शिवसेना जिल्हाप्रमुख या पदावरून हटवण्यात आले. बांगर याच्यावर केलेल्या कारवाईनंतर अवघ्या दोनच दिवसात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे हिंगोली जिल्ह्याचा नवीन जिल्हाप्रमुख जाहीर करणार आहेत.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान बंडखोर आमदार संतोष बांगर हे शिवसेनेसोबत होते. शिवसेनेच्या सुनील प्रभू यांचा व्हीप मानत संतोष बांगर यांनी शिवसेनेच्या बाजूने मतदानही केले होते. मात्र बहुमत चाचणीआधी त्यांनी अचानक बंडखोरी करत सुरत गाठली. त्यांनी बदलेल्या भूमिकेमुळे शिवसेनेसह अनेकांना चांगलाच धक्का बसला होता.