हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान सेना – भाजप मध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांची सुरक्षा वाढवण्यात आली असल्याचे समजते आहे.
संजय राऊत यांच्या ताफ्यात दोन अतिरिक्त एसपीयूचे जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यांना स्पेशल प्रोटेक्शन युनिटच्या एकूण 6 शस्त्रधारी जवानांची सुरक्षा देण्यात आली आहे. या शिवाय 12 पोलीस जवानांसहीत साध्या वर्दीतील पोलिसांचा समावेशही त्यांच्या सुरक्षेत करण्यात आला आहे. राऊत यांना सध्या वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी राणे- सेना वादा नंतर भाजपा नेते नितेश राणे आणि निलेश राणे यांनी संजय राऊत यांना एक इशारा दिला होता. संजय राऊत जिथे दिसतील तिथे करेक्ट कार्यक्रम करू, असा या दोघांनीही सांगितलं होतं. त्यानंतरच आता राऊत यांच्या सुरक्षेत ही वाढ करण्यात आल्याचं दिसत आहे.