हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवरुन पुन्हा वाद सुरु झाला आहे. शिवजयंती ही तिथीनुसारच साजरी करावी असा शिवसेनेचा नेहमी आग्रह राहिला आहे. त्यानुसार शिवसेना शासकीय तारखेला फाटा देत तिथीनुसार शिवजयंती साजरी करत आली आहे. मात्र, आता राज्यात महा विकास आघाडीचं सरकार असून उद्धव ठाकरे हे या सरकारचे मुख्यमंत्री आहेत. तेव्हा शिवजयंती साजरी करण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकप्रकारे धर्मसंकटात सापडले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने तिथी सोडा, तारखेनुसारच शिवजयंती साजरी करा अशी मागणी केली आहे.
अशा बिकट परिस्थितीत राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी शिवसेनेची भूमिका मांडली आहे. ”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शासकीय शिवजयंती (तारखेनुसार 19 फेब्रुवारी) साजरी करतील, मात्र शिवसेना तिथीप्रमाणे शिवजयंती करणार आहे,” असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. शिवजयंती एकाच दिवशी साजरी व्हावी हा वाद सोडवण्यासाठी त्याबाबत सरकार एक समिती स्थापन करणार आहे. त्यानंतर शिवजयंती बाबत निर्णय होईल, असंही अनिल परब यांनी सांगितलं.
शिवजयंतीवरून राजकीय नेत्यांच्या भूमिका
१)विनायक मेटे
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं आराध्यदैवत. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की, महाराष्ट्रात तारीख आणि तिथीचा वाद सुरु होतो. आता पुन्हा तारखेनुसार म्हणजे 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्याची मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे.
२) अमोल मिटकरी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनीही तिथीचा हट्ट सोडा आणि 19 फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करा, असं आवाहन ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे.
३)नितेश राणे
“राज्यात राष्ट्रवादीची सत्ता आहे. मग तर एकच शिवजयंती झालीच पाहिजे. एकदा काय तो दोन शिवजयंतीचा वाद मोडून टाकाच. एक शिवप्रेमी म्हणून तुमच्या बरोबर आहे. हीच ती वेळ, जय शिवराय,” अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.