उर्मिला मातोंडकरनंतर आता अभिनेता शरद पोंक्षेंना शिवसेनेकडून विधानपरिषदेची उमेदवारी?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी शिवसेनेने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिचे नाव पाठविले असल्याची चर्चा सुरू आहे. तर अभिनेता शरद पोंक्षे यांचेही नाव राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठी शिवसेनेने पाठविले असल्याचे समजते. शिवसेनेच्या कोट्यातून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. कालच उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेच्या प्रस्तावाला होकार दिला होता. त्यामुळे आता शिवसेनेच्या कोट्यातील आणखी तीन जागा शिल्लक आहेत. राज्यपाल नामनिर्देशित सदस्यपदासाठी कला, नाट्य किंवा अन्य क्षेत्रात लक्षणीय योगदान दिलेल्या व्यक्तींचा प्राधान्याने विचार केला जातो.

त्यामुळे शिवसेनेकडून अभिनेता शरद पोंक्षे यांचे नावही चर्चेत आहे. अलीकडच्या काळात भाजपकडून शिवसेनेला सातत्याने हिंदुत्व आणि सावरकरांच्या मुद्द्यावरुन लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे भाजपला तोडीसतोड उत्तर देण्यासाठी शिवसेनेकडून शरद पोंक्षे यांच्या नावाचा विचार सुरु असल्याचे समजते. मात्र, महाविकासआघाडील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांना हे नाव चालणार आहे का, हादेखील कळीचा प्रश्न आहे. कारण, सावरकर मुद्द्यावरुन शरद पोंक्षे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाशी नेहमीच मतभेद राहिले आहेत.

दरम्यान, महाविकासआघाडी सरकारकडून लवकरच विधान परिषदेतील राज्यपालनियुक्त सदस्यांच्या जागा भरण्यासाठी शिफारस करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजूर झाला. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात शुक्रवारी वर्षा बंगल्यावर चर्चाही झाली होती. या बैठकीत राज्यपालनियुक्त 12 सदस्यांची नावे निश्चित झाल्याचे समजत आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे 12 जणांची यादी सुपूर्द करतील, असा अंदाज आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in