भाजप मंत्री म्हणतात बीफ खावा; बीफ वरील बंदी उठली काय? म्हणत शिवसेनेने सोडला टिकेचा बाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चिकन मटण खाण्यापेक्षा बीफ खावा अस वादग्रस्त वक्तव्य भाजप मंत्री सणबोर शूलाई यांनी केल्यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन भाजपवर जोरदार टीका केली आहे. बीफ वरची बंदी उठली काय असा सवाल करत बीफ प्रकरणी ज्यांचे झुंडबळी गेले …ज्यांना बीफ बाळगले म्हणून अपमानित केले त्या सर्वांची माफी मागा अशी मागणी शिवसेनेने केली.

भारतीय जनता पक्ष हा एक हिंदुत्ववादी पक्ष आहे, पण त्यांचे हिंदुत्व राजकीय सोयीचे आहे काय, याचे आत्मपरीक्षण त्यांनीच करण्याची वेळ आली आहे. मेघालयात भारतीय जनता पक्षाचे मंत्री सनबोर शुलाई सांगतात, ‘लोकहो, चिकन, मटण, मासे कसले खाता? बीफ खा बीफ! गोमांस खा. त्यातच मजा आहे!’ गोमांस भक्षणाची ही अशी तरफदारी करणाऱ्या भाजप मंत्र्यांनी असे हिंदुत्वविरोधी वक्तव्य करूनही या महाशयांचा बालही बाका झाला नाही. हे असे विधान भाजपची सत्ता नसलेल्या एखाद्या राज्यात झाले असते तर एव्हाना त्या मंत्र्याच्या घरास घेराव घालून त्यास बडतर्फ करण्याच्या मागण्या सुरू झाल्या असत्या. इतकेच काय, ज्या सरकारातला मंत्री गोमांस भक्षणाचे समर्थन करतोय ते सरकार पक्के देशद्रोही, पाकिस्तानप्रेमी असल्याचे सांगत त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणीही झाली असती, पण भाजपच्या मंत्र्याने गाई कापून खा असे बेताल विधान करूनही एकाही भाजप प्रवक्त्याने गोमातेच्या सन्मानार्थ प्रतिक्रिया दिल्याचे दिसत नाही. असा टोला शिवसेनेने लगावला.

गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तर गोव्यात ‘बीफ’ कमी पडू दिले जाणार नाही. वाटल्यास बाहेरुन बीफ मागवू व गोवेकरांच्या गरजा भागवू, अशी भूमिका घेतली होती. पर्रीकर हे काय साधेसुधे असामी नव्हते. त्यांच्या विचारांची नाळ हिंदुत्वाशी घट्ट जोडली होती व ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर ‘सेवक’ होते. पण त्यांनी आपल्या राज्यात गोमांस विकायला व खाण्यास पूर्ण सूट देऊनही हिंदुत्ववाद्यांचे मन पेटून उठले नाही.

गाईंना ‘डोके’ असते तर गोवा, ईशान्येकडील राज्यांत गाईंचे शिष्टमंडळ राजभवनात जाऊन राज्यपालांना भेटले असते व इतर राज्यांत ज्याप्रमाणे गोवंश हत्याबंदी आहे तसा कायदा लावून आमच्या कत्तली थांबवा अशी मागणी करणारा हंबरडा त्यांनी फोडला असता किंवा ज्या राज्याचे मंत्री ‘बीफ’ खाण्याचा प्रचार करतात त्या राज्यांतून गाय जमातीस हिंदुत्ववादी राज्यांत स्थलांतरित करा, अशीही मागणी गाईंच्या संघटनेने करायला मागेपुढे पाहिले नसते. पण शेवटी गाईच त्या. मुक्या-बिचाऱ्या. कोणीही हाका आणि कोणीही कापा अशीच त्यांची अवस्था झाली आहे असे शिवसेनेने म्हंटल.

Leave a Comment