बेईमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवले, पण शेवटी ती गुलामीच; शिवसेनेचा शिंदेंवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार असून तत्पूर्वीच मंत्रिमंडळ खातेवाटपावरून शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून भाजप आणि शिंदे गटावर पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली आहे. बेईमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवले, पण शेवटी ती गुलामीच… गुलामांना कधीच प्रतिष्ठा मिळत नाही अशी जोरदार टीका शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन बुधवारपासून सुरू होत आहे. महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि महाप्रलयाचे सावट आहे. शेती, घरे, गुरेढोरे यांचे अतोनात नुकसान झाले. लोक वाहून गेले. घरसंसार वाहून गेले. पण शिंदे व फडणवीस गटाचे जे सरकार सध्या स्थानापन्न झाले आहे त्यांना राज्याच्या चिंतेपेक्षा स्वतःच्याच चिंतांनी ग्रासले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला. पण या महोत्सवात महाराष्ट्रांच्या वाटयाला अमृताचे दोन कण सोडाच, पण लाचारी आणि गुलामीच्याच बेडया पडल्याचे दिसते. शिंदे गटाचे अस्वल झाले व दरवेशी श्री. फडणवीस महोदय आहेत हे एकंदरीत जे खातेवाटप वगैरे झाले त्यावरून स्पष्ट दिसते. भाजपने फेकलेल्या तुकडयांवर व खोक्यावरच त्यांना यापुढे गुजराण करावी लागेल. असा टोला शिवसेनेनं लगावला.

एक कार्यकर्ता शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, विरोधी पक्षनेता, सर्वोच्च मंत्रीपदापर्यंत पोहोचला तो शिवसेनेमुळे. त्याच कार्यकल्पनि बेइमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवले, पण शेवटी ती गुलामीच आहे. गुलामांना कधीच प्रतिष्ठा मिळत नाही. शिंदे गटाची बोटे छाटली जातील तेव्हा गुलामांचे मालक नवा घरोबा शोधण्यासाठी बाहेर पडतील. बेइमानी करून सरकार तर तुम्ही बनवले, पण आता तुम्हाला विधानसभेला तोंड द्यावे लागेल. तेव्हा बोटे व कोथळा शाबूत ठेवून सभागृहात या. 50 कोटीत आमदार विकला जातो, या बातम्या धक्कादायक आहेत.  त्यामुळे लोकांचा राजकारणावरचा विश्वास उडालाय, हे 50-50 कोटी आदिवासी भागातील आरोग्य सुविधांवर खर्च झाले असते तर अनेकांचे जीव वाचले असते, विधिमंडळात या सगळ्यावर उठाव व्हावा. उठाव हा शब्द शिंदे गटास प्रिय आहे, म्हणून हे सांगणे तूर्तास इतकेच असं म्हणत शिवसेनेनं शिंदे गटाचा कडक शब्दात समाचार घेतला.