हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यपालांच्या हातातील संविधानाचे पुस्तक नक्की कोणाचे? डॉ. आंबेडकरांचे की अन्य कोणाचे? असा सवाल करत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यावर निशाणा साधला. तसेच राज्यातील ठाकरे सरकार पायउतार झाल्याचा सगळ्यात जास्त आनंद आपले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना झाला, असेही शिवसेनेनं म्हंटल.
भाजपच्या अनैतिक कृत्यात आपल्या महामहिम राज्यपालांनी सहभागी व्हावे याचे आता कुणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. विधानसभा अध्यक्षपदाची निवड ‘हेड काऊंट’ पद्धतीने झाली, पण महाविकास आघाडी सरकारला तशी परवानगी नव्हती. त्यावेळी गुप्त मतदान त्यांना हवे होते. मग राज्यपालांच्या हातातील संविधानाचे पुस्तक नक्की कोणाचे? डॉ. आंबेडकरांचे की अन्य कोणाचे? त्यांच्या हातातील न्यायाचा तराजू हा सत्याचा की सुरतच्या बाजारातला? हा प्रश्न मराठी जनतेला पडला आहेच. अस शिवसेनेने म्हंटल.
महाराष्ट्रातले ठाकरे सरकार गेल्यास म्हणजे हिंदुहृदयसम्राटांच्या विचारांचे सरकार पायउतार झाल्याचा सगळ्यात जास्त आनंद आपले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना झाला, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा, तर क्रांतिवीर भगतसिंगास लाहोरच्या मध्यवर्ती तुरुगात ब्रिटिशांनी फाशी दिली त्यावेळी ब्रिटिशांना जो आनंद झाला असेल तसा, नवनिर्वाचित मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना त्याच आनंदाच्या भरात राज्यपालानी पेढा भरवून आनंद व्यक्त केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना हा आनंद झाला नव्हता. बहुधा राजभवन परिसरातील पेढयांची दुकाने बंद पडली असावीत. असा खोचक टोला शिवसेनेने लगावला.
श्री. शरद पवार म्हणतात ते विधान गमतीचे असले तरी खरेच आहे. मी आतापर्यंत चारवेळा मुख्यमंत्री झालो, पण राज्यपालांनी एकदाही पेढा भरवला नाही,’ असे शरद पवार म्हणाले. ते बरोबरच आहे. कारण राज्यपाल हा तटस्थ व घटनेचा रखवालदार असतो. मुख्यमंत्री कोण, कोणत्या पक्षाचा आला-गेला तरी त्यांना फरक पडत नाही, पण गेल्या दोन-चार वर्षांत महाराष्ट्रातील राजभवनात वेगळेच चित्र दिसत आहे असे सामनातून म्हंटल आहे.