हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण भाजपमधून बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणारे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांच्या विरोधातील उमेदवारी अर्ज शिवसेना मागे घेणार असून त्यांच्या प्रचारासाठीहि शिवसेना उतरणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे
संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले, उत्पल पर्रिकरांनी अर्ज भरला आहे. त्यांचा अर्ज वैद्य ठरला आहे. त्यामुळे आमचा उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर उमेदवारी अर्ज मागे घेईल. तसेच शिवसेना स्वतः त्यांच्यासाठी प्रचार करेल. एवढंच नव्हे तर आमचे कार्यकर्ते मुंबईतून गोव्याला येतील आणि उत्पल पर्रिकर यांचा प्रचार करतील.
दरम्यान, यावेळी त्यांनी गोव्यात प्रचाराला जाणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही टीका केली. अमित शहा हे उत्तर प्रदेशात आणि गोव्यात घरोघरी प्रचार करत आहेत. चांगलं आहे. ही त्यांची पक्षाशी निष्ठा आहे. देशासमोर अनेक प्रश्न असताना ते घरोघरी जात आहेत, असा टोला राऊतानी लगावला