भाजपला नेहरू- गांधी परिवाराचे काही शिल्लकच ठेवायचं नाही; सामनातून थेट आरोप

Sanjay Raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या ईडी च्या रडारावर असून आज सलग चौथ्या दिवशी त्यांना चौकशी साठी हजर करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणेवर जोरदार टीका केली. भाजपला पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या स्मृती फक्त नष्टच करायच्या नाहीत, तर त्या परिवाराची वंशवेलही कायमची संपवून टाकायची आहे. या देशात नेहरू-गांधी नावाचे काही शिल्लक ठेवायचे नाही, असा विडा उचलूनच राष्ट्रीय कार्याची दिशा ठरवली गेली आहे असा थेट आरोप शिवसेनेनं केला आहे.

‘नॅशनल हेराल्ड’ हे स्वातंत्र्य संग्रामात लढणारे वृत्तपत्र होते. पंडित नेहरूंनी या वृत्तपत्राची स्थापना केली. हे वृत्तपत्र आर्थिक संकटात सापडले, तेव्हा काँग्रेसने ‘कर्ज’ देऊन ही संस्था वाचवली. हे सर्व प्रकरण मनी लॉण्डरिंगच आहे असे ‘ईडी’ने ठरवले व राहुल तसेच सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलावले. सोनिया गांधी या कोविडमुळे इस्पितळात दाखल आहेत, राहुल गांधी ‘ईडी’समोर हजेरी लावत आहेत. त्यामुळे काँग्रेसचे सर्व नेते व असंख्य कार्यकर्ते दिल्लीच्या रस्त्यावर उतरून निषेध करीत आहेत. भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी काँग्रेसचा सत्याग्रह हा तपास यंत्रणांवर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. “कायद्याच्या वर कोणी नाही, कायद्यापुढे सर्व समान आहेत,” असेही सौ. इराणी म्हणतात ते खरेच आहे, पण भाजपपुढे कायदा आज खुजा झालेला दिसतोय. शिवसेना, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, झारखंड मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांच्याच मागे ‘ईडी’ वगैरेचा ससेमिरा लागलेला आहे. हे लोक त्यांच्या घराघरात घुसतात, तसे कुण्या भाजपवाल्यांच्या घरात घुसल्याचे कधी दिसले नाही अस शिवसेनेनं म्हंटल.

भाजपला पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या स्मृती फक्त नष्टच करायच्या नाहीत, तर त्या परिवाराची वंशवेलही कायमची संपवून टाकायची आहे. या देशात नेहरू-गांधी नावाचे काही शिल्लक ठेवायचे नाही, असा विडा उचलूनच राष्ट्रीय कार्याची दिशा ठरवली गेली आहे. हे सूडाचे राजकारण आहे. सत्ता ही विनयाने वापरायची असते, राष्ट्रकल्याणासाठी तिचा अंमल करायचा असतो. राजकीय लढाया निवडणुकीच्या आखाडय़ात लढायच्या असतात. हीच या देशाची परंपरा आहे. आज राजकीय लढाया कुटुंब उद्ध्वस्त करण्यापर्यंत पोहोचल्या. राजकीय विरोधकांना पाणीही मागू द्यायचे नाही, अशा पद्धतीने हल्ले सुरू आहेत.

राहुल गांधी यांना छळायचे व आम्ही त्यांचा छळ करू शकतो याचे प्रदर्शन घडवायचे, विरोधात उठलेला प्रत्येक श्वास बंद करायचा हीच नवी लोकशाही उदयास आली आहे. बुलडोझर फक्त घरांवरच फिरतो असे नाही, तो व्यक्तीच्या नागरी अधिकारांवर आणि देशाच्या स्वातंत्र्यावरही फिरताना स्पष्ट दिसत आहे. आज राहुल गांधी, उद्या सोनिया गांधी, त्यानंतर आणखी कोणी! विरोधकांना खतम करण्यासाठी हिटलरने ‘ज्यूं’च्या कत्तली केल्या तसे ‘विषारी गॅस चेंबर्स’ निर्माण करणे तेवढेच बाकी आहे. राजकीय सूडाची पावले त्याच दिशेने पडत आहेत. देशात कायद्याचे राज्यच राहिले नाही, तेथे ‘कायदा सगळय़ांसाठी समान’ या बोलण्यास काय अर्थ?