हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर भिडे हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त विधानाने चर्चेत आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी, आराध्य दैवत साईबाबा आणि माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत मनोहर भिडे यांनी अकलेचे तारे तोडलेत. भिडे यांच्या या विधानावरून शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून जोरदार समाचार घेतला आहे. सध्या काही लोक मिशी व दाढीवर बोटे फिरवत उसने अवसान आणत आहेत. आत्याबाईच्या मिश्यांप्रमाणे त्यांची अवस्था आहे, पण झुरळांनाही मिश्या असतात व अनेकदा फवारणी करून ढेकूण व झुरळे मारावी लागतात अशी टीका सामनातून भिडेंवर करण्यात आली आहे.
सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल?
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या गुरुजींनी महात्मा फुले, संत साईबाबा, गांधी, नेहरू यांच्यावर घाणेरड्या भाषेत चिखलफेक करून माहौल बिघडवला आहे. हरयाणाप्रमाणे महाराष्ट्रातही जातीय विद्वेष भडकवून आगी लावण्याच्या कारस्थानाचे हे पहिले पाऊल आहे. ज्या औरंग्यास महाराष्ट्राने गाडले त्याच्या कबरीवरची माती उकरण्याचा प्रयत्नदेखील सुरू झाला आहे. देश घडविण्याची अक्कल नसली की, देश जाळून राज्य करायचे हा या मंडळींचा कावा आहे. संपूर्ण देशातच लोकसभा निवडणुकीपूर्वी हे असे जातीय व धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण करायचे व जागोजागी ढोंगी हिंदुत्वाच्या घंटा वाजवून प्रचारात उतरायचे असे एकंदरीत कारस्थान दिसते. त्या पूर्वतयारीसाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, फडणवीसाची गुरुजी ब्रिगेड अशा फौजांना आधीच मैदानात उतरवले गेले आहे. महाराष्ट्रात फडणवीसांच्या गुरुजींनी महात्मा फुल्यावर घाणेरडे विधान केले, तरीही फुल्यांचे वैचारिक वारसदार छगनराव भुजबळ हे फडणवीसांच्या मांडीस मांडी लावून सरकारात बसले आहेत. सत्तेसाठी विचारांना तिलांजली असेच एकंदरीत हे धोरण आहे असं सामनातून म्हंटल आहे.
फडणवीसांचे गुरुजी महाराष्ट्रात दंगलीच्या कोठारावर विडया शिलगावत बसले आहेत. या कोठाराचा स्फोट होऊन महाराष्ट्रासारखे राज्य खाक होईपर्यंत वाट पाहायची काय? सध्या काही लोक मिशी व दाढीवर बोटे फिरवत उसने अवसान आणत आहेत. आत्याबाईच्या मिश्यांप्रमाणे त्यांची अवस्था आहे, पण झुरळांनाही मिश्या असतात व अनेकदा फवारणी करून ढेकूण व झुरळे मारावी लागतात. शिवरायांच्या महाराष्ट्रात आगी लावण्याचे कंत्राट कोणी घेतले असेल तर जनतेने सावध राहायला हवे. फडणवीसांना गुरुजी असतील, पण महाराष्ट्राची अकरा कोटी जनता हेडमास्तर आहे. मणिपूर, हरयाणाच्या वाटेने महाराष्ट्र जाणार नाही. गुरुजी म्हणजे हिंदुत्व नाही, गुरुजी म्हणजे महाराष्ट्र नाही फडणवीसांना हे असे गुरुजी लाभल्यानेच महाराष्ट्र शिवरायांच्या, फुले, आंबेडकर, शाहूच्या मार्गापासून भरकटताना दिसत आहे. पण महाराष्ट्र हे शहाण्यांचे व शूरांचे राज्य आहे. शाईस्तेखानाची बोटे छाटणारा महाराष्ट्र झुरळाच्या मिश्याची पर्वा कशाला करेल? असं म्हणत ठाकरे गटाने मनोहर भिडे यांच्यावर घणाघात केला आहे.