हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय जनता पक्षाला अण्णांनी वरदान दिले आहे? तुम्ही हवा तितका भ्रष्टाचार करा. मी तुमच्या घोटाळयांकडे अजिबात पाहणार नाही. भाजपने जे वॉशिंग मशीन निर्माण केले आहे त्यास अण्णांचा आशीर्वाद आहे का? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून केला आहे. तसेच अण्णा, मशाल हाती घ्या… पेटवा ती मशाल! असं आवाहन सुद्धा त्यांना करण्यात आलं आहे. सामनातून अण्णा हजारे यांच्या आजपर्यंतच्या भूमिकांवरून निशाणा साधण्यात आला आहे. आण्णा हजारे यांनी अचानक अशी मागणी केली की, मणिपुरात महिलांची नग्न धिंड काढणाऱ्यांना फाशी द्यावी. मणिपूरचे प्रकरण गंभीर आहे व सरकारने त्याबाबत चालढकल करू नये, असे अण्णांचे म्हणणे आहे. अण्णांचे काहीच चुकले नाही. अण्णा जागे आहेत व त्यांचे देशातील घडामोडींवर लक्ष आहे हे यामुळे दिसले असा टोला सामनातून लगावण्यात आला.
मणिपूरच्या नग्नसत्यावर सारे जग थुंकते आहे; पण त्याची पर्वा ना आपल्या पंतप्रधान मोदींना, ना त्यांच्या बकध्यान करणाऱ्या सरकारला. त्यामुळे इतक्या दिवसांनी जागे होऊन अण्णांनी काय मिळवले? महिलांची अब्रू लुटणाऱ्या नराधमांना फाशी द्या ही सगळय़ांचीच मागणी आहे. या अपराध्यांकडे डोळेझाक करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या गृहमंत्र्यांना पदमुक्त करावे, निदान मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना तरी घरी पाठवा, मागणी अण्णांनी केली असती तर ते अधिक योग्य ठरले असते.
अण्णांच्याच कृपेने दिल्लीतील आजचे मोदींचे सरकार स्थानापन्न झाले. अण्णांनी काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर जंतर मंतर रोड, रामलीला मैदानात उपोषणाचा बार उडवून देशाला जागे केले व त्याच जागे झालेल्या मतदारांनी काँग्रेसचा पराभव केला व भाजपास सत्तेत आणले; पण भाजप सरकारचा कारभार असा चालला आहे की, आधीची काँग्रेसची राजवट ही नीतिमान व चारित्र्यवान वाटावी. अण्णांनी भाजपचे सरकार बसवले व ते राळेगणसिद्धीत जाऊन बसले ते बसलेच. महाराष्ट्रात व देशात सध्या जे चालले आहे त्याचा उबग येऊन अण्णांना मानसिक त्रास झाला असेल व त्यातून त्यांना एकप्रकारची विरक्ती आली असेल. पण अण्णा हे त्या अर्थाने संन्यासी नाहीत. ते लढाईच्या मैदानातील संन्यासी आहेत व त्यांच्याकडे सात्त्विक लढय़ाचे तेज आहे. भल्याभल्यांना त्यांनी नमवले व घरी बसवले. मग तेच अण्णा आता गप्प का? असा सवाल सामनातून करण्यात आलाय
राफेल’ पासून अदानीपर्यंत लाखो कोटींची लूट मोदी सरकारने केली. महाराष्ट्रात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, घोटाळयांचे आरोप प्रत्यक्ष पंतप्रधान मोदींनी केले ते सर्व घोटाळेबाज आज महाराष्ट्राच्या सत्तेत सामील आहेत. महाराष्ट्रातील आमदार व खासदार पन्नास-पन्नास खोक्यांना विकले गेले. या खोकेबाजीवर अण्णा उसळून उठले असते बरे झाले असते. पण आजपर्यंत तरी तसे झालेले नाही. असे तर नाही की, भारतीय जनता पक्षाला अण्णांनी वरदान दिले आहे? तुम्ही हवा तितका भ्रष्टाचार करा. मी तुमच्या घोटाळयांकडे अजिबात पाहणार नाही. भाजपने जे वॉशिंग मशीन निर्माण केले आहे त्यास अण्णांचा आशीर्वाद आहे का? असे सवाल करत ठाकरे गटाने अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधला आहे.