मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्र निर्मिती नंतरच्या तेराव्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज हाती येत आहे. मतदानोत्तर एक्झीट पोलमध्ये भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करू शकेल असा दावा करण्यात येत होता. तर शिवसेना शंभरी पार करेल असा अंदाज होता. भाजपचे स्वबळाचे स्प्न पुर्ण होण्याची चिन्हे विरली आहेत मात्र, सेना शंभरीच्या आसपास पोहचली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची गळती, पक्षातील दिग्गज नेत्यांचे सत्ताधारी पक्षात पलायन यामुळे राष्ट्रवादीची ताकद क्षीण झाल्याचे बोलले जात होते. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेवटच्या क्षणापर्यंत झूंज दिली. संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. जिथले – जिथले नेते सोडून गेलेत तेथे झंझावती सभा घेतल्या. तसंच संपुर्ण राज्यात साता-याची निवडणूक दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. तेथे राष्ट्रवादीनं आपला गड राखला.
तर, एक वेळ अशी होती की युतीमध्ये शिवसेना मोठ्या भावाच्या भूमिकेत असायचा. मात्र, बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर काही वर्षात शिवसेनेची वाताहत झालेली पाहायला मिळआली. भाजपचं वर्चस्व वाढताना दिसलं. २०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी संपुर्ण भारत मोदीमय भाजपमय केल्याचे आपण पाहीले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही देवेंद्र फडणवीस आणि केंद्रिय नेतृत्त्वाने शिवसेनेला समसमान जागा न देता काही ठिकाणी तर सेनेचा एकही उमेदवार नसल्याचे दिसले. असे असले तरी, पुणे, नाशिकमध्ये एकही जागा न लढवणाऱ्या, युतीत पहिल्यांदाच भाजपापेक्षा कमी जागा लढवणाऱ्या शिवसेनेला मुंबई, ठाण्यानं मोठा हात दिला आहे. राज्यात मोठा भाऊ असलेला भाजपा मुंबई, ठाण्यात मात्र छोटा भाऊ ठरताना दिसत आहे. मतमोजणीला सुरुवात होताच शिवसेनेनं मुंबई, ठाण्यात आघाडी घेतली आहे. सध्या शिवसेना राज्यात ७० पेक्षा अधिक जागांवर पुढे आहे.यामध्ये मुंबई, ठाण्याचा मोठा वाटा आहे.
सध्या मुंबईत भाजपा १५ जागांवर पुढे आहे. तर शिवसेनेनं १६ जागांवर आघाडीवर आहे. गेल्या निवडणुकीत भाजपानं मुंबईत १५ जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेला १४ जागांवर यश मिळालं होतं. ठाण्यात शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारली आहे. ठाण्यात शिवसेना तब्बल २० जागांवर पुढे आहे. तर भाजपा ७ मतदारसंघांत आघाडीवर आहे. मागील निवडणुकीत ठाण्यात भाजपानं ७, तर शिवसेनेनं १५ जागा जिंकल्या होत्या.पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते निवडणुकीच्या आधीत भाजपामध्ये गेले. त्यामुळे राष्ट्रवादीला खिंडार पडलं. मात्र प्रतिकूल परिस्थितीतही राष्ट्रवादीनं पश्चिम महाराष्ट्रात पवार पॉवर दाखवून दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रात एकूण ७० जागा आहेत. यापैकी २४ जागांवर राष्ट्रवादी पुढे आहे. तर भाजपा २२, तर शिवसेना १२ जागांवर आघाडीवर आहे.