नंदुरबार प्रतिनिधी । महाशिवआघाडी सध्या राज्यातील सरकार स्थापनेवरून सत्तानाट्य सुरु असून भाजप शिवसेनेसह राष्ट्रवादी देखील बहुमत सिद्ध न करू शकल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. भाजपसोबत झालेल्या सत्तासंघर्षानंतर शिवसेनेनं भाजपसोबत काडीमोड घेऊन आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यात एक नवी राजकीय त्रिकुट तयार होऊन महाशिवआघाडी अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.
मात्र आता नंदुरबार येथील एका शिवसैनिकाला हे नवं सत्तासमीकरण मान्य नाही आहे. याबाबत आपली तीव्र नाराजी व्यक्त करत या शिवसैनिकाने चक्क मोबाईल टॉवरवर चढत हटके आंदोलन पुकारलं आहे. तुकाराम पाटील असं या शिवसैनिकाच आहे. शिवसेनेनं भाजपसोबतच सत्ता स्थापन करावी अशी मागणी या शिवसैनिकाने केली.
भाजप आणि शिवसेना ही युती नैतिकतेच्या आधारावर अन्यायाविरुद्ध लढणारी आहे. तेव्हा शिवसेनेनं काँग्रेसोबत सत्तालोभासाठी जाऊ नये असं आवाहन या शिवसैनिकाने केल आहे. जनतेने महायुतीला मतदान करत त्यांना विजय मिळवून दिला आहे. काँग्रेसोबत जाणे हा या विजयाचा अपमान आहे. तसेच जोपर्यंतचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्याशी संवाद साधत नाहीत तो पर्यंत खाली उतरणार नाही असा पवित्रा पाटील यांनी घेतला आहे.