Wednesday, June 7, 2023

पसरणी घाटात शिवशाही बस- ट्रॅव्हल्सचा अपघात,तब्बल ५० प्रवासी जखमी झाल्याची भीती

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

साताऱ्यामधील वाई आणि महाबळेश्वर मार्गावर असणाऱ्या पसरणी घाटामध्ये शिवशाही बस आणि खासगी ट्रॅव्हल्स चा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तब्बल ४० ते ५० प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातातील जखमींना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बचावकार्य वेगाने सुरू आहे.

दरम्यान प्रवाशांना अधिक आरामदायी सेवा मिळावी यासाठी एसटी महामंडळाने अडीच वर्षांपूर्वी सुरू केलेल्या शिवशाही बसच्या अपघातांची मालिका थांबत नसल्याचे समोर आले आहे. गेल्या सव्वा दोन वर्षांतील राज्यातील अपघातांचा आकडा ५५० वर गेला आहे. याचा अर्थ बसचे दररोज एक ते दोन अपघात होत असल्याने ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेशी तर तडजोड केली जात नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज देखील साताऱ्यामधील प्रसिद्ध पसरणी घाटात शिवशाही बसला भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. पसरणी घाटात शिवशाही बस आणि खाजगी ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये तब्बल ४० ते ५० प्रवासी जखमी झाले आहेत.

स्थानिक नागरिकांनी आणि काही प्रवाश्यांनी जखमी झालेल्या प्रवाश्यांना तातडीने बस च्या बाहेर काढण्यास मदत केली. यावेळी वैद्यकीय मदत येई पर्यंत जखमी प्रवाश्यांना रस्त्यावर झोपून रहावे लागले असण्याचे देखील यावेळी पाहण्यात आले. तसेच अपघातानंतर घाटामध्ये वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असून अपघातामध्ये कोणी प्रवासी मृत झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही.